
शासकीय वनातून चालली होती बेकायदेशीर वाहतूक; पाठलाग करून दोन तस्करांना रंगेहाथ पकडले, तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार
गडचिरोली : जिल्ह्यातील मौल्यवान वनसंपत्तीची लूट करणाऱ्या आंतरजिल्हा तस्करांच्या टोळीचा आलापल्ली वनविभागाने पर्दाफाश केला आहे. घोट वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या निकतवाडा-अंबेला रस्त्यालगतच्या शासकीय वनातून सागवानाची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या टोळीवर वनविभागाने ३ जून रोजी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. या कारवाईत वनविभागाने तब्बल १५ लाख रुपयांच्या मुद्देमालासह दोन मुख्य तस्करांना रंगेहाथ अटक केली आहे, तर त्यांचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पसार झाले. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे आंतरजिल्हा लाकूड तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, उपक्षेत्र घोट अंतर्गत निकतवाडा-अंबेला रस्त्यालगतच्या शासकीय जंगलातून सागवान झाडांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर तोड करण्यात आली होती. हा मौल्यवान ऐवज एका ‘एमएच ४० सीडी ४४१४’ क्रमांकाच्या मालवाहू वाहनात भरून त्याची अवैध वाहतूक केली जाणार असल्याची अत्यंत अचूक व गोपनीय माहिती विकासपल्लीचे क्षेत्र सहायक बी. डी. साबळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने तातडीने परिसरात रात्रीच गस्त घालत सापळा रचला. बुधवारी पहाटे ३:०० वाजताच्या सुमारास संशयास्पद चारचाकी वाहन येताना दिसताच, दबा धरून बसलेल्या वन कर्मचाऱ्यांनी ते वाहन अडविले.
वनविभागाच्या पथकाने गाडी थांबविताच, मागच्या डाल्यामध्ये लपून बसलेले ३ इसम चालत्या गाडीतून उड्या मारून रात्रीच्या अंधाराचा व घनदाट जंगलाचा फायदा घेत पसार झाले. मात्र, वनविभागाच्या सतर्क जवानांनी गाडीला वेढा घालत मुख्य चालक आकाश विनोद यादव आणि सौरभ सीताराम प्रधान या दोन मुख्य आरोपींना जागीच झडप घालून रंगेहाथ पकडले. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर वन कायद्यान्वये गुन्हा नोंद करून त्यांना चामोर्शी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही आरोपींना ३ दिवसांची वनकोठडी सुनावली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
पकडलेल्या मालवाहू वाहनाची कसून झडती घेतली असता, त्यात ग्रीन नेटच्या (हिरवी जाळी) आड लपवून ठेवलेले सागवान प्रजातीचे गोल लाकडाचे ८ नग (१.३३९ घनमीटर) आढळून आले. वनविभागाने दिलेल्या अधिकृत मूल्यमापनानुसार जप्त केलेल्या या तस्करीच्या सागवानाची बाजारपेठीय किंमत १ लाख ५७ हजार ६२३ रुपये आहे. या कारवाईत वनविभागाने १.५७ लाखांचे सागवान, तस्करीसाठी वापरलेले चारचाकी मालवाहू वाहन, ग्रीन नेट आणि २ महागडे मोबाईल असा एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आलापल्ली वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही यशस्वी आणि धाडसी कारवाई क्षेत्र सहायक बी. डी. साबळे, वनरक्षक एन. बी. गावडे, डी. जे. गावडे, सपना हिचामी आणि के. व्ही. भसारकर यांच्या संयुक्त पथकाने चोखपणे पार पाडली. जंगलातील अवैध वृक्षतोड आणि तस्करी रोखण्यासाठी वनविभागाची गस्त अधिक तीव्र करण्यात आली आहे.



