
चंद्रपूर : आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील शासकीय आश्रमशाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुणांकन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील ‘शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, चिंधीचक’ने बाजी मारली आहे. ८१.२४ टक्के गुण मिळवत या शाळेने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
आदिवासी विकास आयुक्त लीना बन्सोड यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये ही राज्यस्तरीय गुणांकन स्पर्धा राबविण्यात आली. यामध्ये राज्यातील चारही विभागांतील ५०४ शासकीय आश्रमशाळांची शैक्षणिक गुणवत्ता, सुविधा आणि विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. बालहक्क संरक्षण प्रणाली, भाषा आणि गणित विषयातील पायाभूत साक्षरता चाचणी अशा विविध घटकांवर आधारित हे मूल्यांकन तीन त्रयस्थ संस्थांमार्फत अत्यंत पारदर्शकपणे करण्यात आले.
चिमूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चिंधीचक आश्रमशाळेने सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवून ८१.२४ टक्के गुणांसह राज्यामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले. या स्पर्धेत अमरावती विभागातील शासकीय आश्रमशाळा झटाळा (७२.१२%) द्वितीय, तर नाशिक विभागातील शासकीय आश्रमशाळा देवमोगरा (६६.९४%) तृतीय स्थानी राहिली.
शाळेच्या या उत्तुंग यशामागे मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका, सर्व कर्मचारी आणि विशेषतः विद्यार्थिनींच्या सामूहिक परिश्रमांचा मोठा वाटा आहे. तसेच प्रकल्प अधिकारी श्रीमती जागृती कुमरे यांचे मार्गदर्शन आणि शिक्षण विस्तार अधिकारी श्री. वाटाने यांचे सहकार्य यशाची गुरुकिल्ली ठरले आहे. शाळेच्या या कामगिरीबद्दल नागपूर विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी मुख्याध्यापकांचा विशेष गौरव केला.
चिंधीचक आश्रमशाळेच्या या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, शिक्षण क्षेत्रातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



