
भंडारा : तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोबरवाही (हेटी) येथे वाघाने एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. बेनीराम राऊत असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे गोबरवाही आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेनीराम राऊत हे आपल्या मुलासोबत, विजय राऊत यांच्यासह नेहमीप्रमाणे गाई चरायला गोबरवाही जंगलालगतच्या परिसरात गेले होते. दुपारी १२ ते १ च्या दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक बेनीराम राऊत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. वाघाने त्यांना पकडून जवळच असलेल्या पाण्याच्या दिशेने फरफटत नेले. हा संपूर्ण थरार विजय राऊत यांच्या डोळ्यांसमोर घडला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या मुलाने गावात धाव घेऊन ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वन विभागाला कळविले. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा व पुढील तपास सुरू आहे. मृत बेनीराम राऊत यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हरपला असून, संपूर्ण गोबरवाही गाव शोकमग्न झाले आहे.
जंगलालगतच्या गावांमध्ये वाघाचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि गुराख्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने या परिसरात तातडीने गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, मृताच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व शासकीय नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.



