गडचिरोलीविदर्भ

रेखेगाव व आनंदपूर येथील अवैध दारूविक्री तात्काळ थांबवा; महिलांची घोट पोलिसांकडे मागणी

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या रेखेगाव आणि आनंदपूर येथे सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री सुरू असल्याने परिसरातील शांतता पूर्णपणे भंग पावली आहे. या अवैध व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, याचा थेट फटका आजूबाजूच्या दारूमुक्त असलेल्या गावांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर, आनंदपूर येथील महिलांनी एकत्र येत दोन्ही गावांतील दारूविक्री पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली आहे.

रेखेगाव आणि आनंदपूर येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीचा फटका आमगाव महाल, विसापूर, खोर्डा, कुदुर्शी टोला, पदा टोला यासह तब्बल १० दारूविक्रीमुक्त गावांना बसत आहे. तसेच गावातही व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. गावातील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी ‘मुक्तिपथ’ अभियानाच्या वतीने रेखेगाव आणि आनंदपूर येथे ‘शक्तीपथ’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत दारूविक्रीमुळे कुटुंबांचे आणि संपूर्ण गावाचे होणारे आर्थिक, सामाजिक नुकसान महिलांना पटवून देण्यात आले. या चर्चेनंतर दोन्ही गावांतील दारूविक्री कोणत्याही परिस्थितीत बंद करण्याचा ठाम निर्णय उपस्थित महिलांनी घेतला. विशेष म्हणजे, या बैठकीला घोट पोलिस मदत केंद्राचे एपीआय शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून महिलांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. याप्रसंगी सजग महिलांनी एपीआय शिंदे यांना निवेदन सादर करून गावातील अवैध दारूविक्रीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

महिलांच्या या भूमिकेला पाठिंबा देत एपीआय शिंदे यांनी गावात दारूबंदी करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच त्यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की, गावातील दारू पिण्याचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. मागणी घटल्यास विक्रेत्यांची दुकाने आपोआप बंद होतील. तरीही जे अवैध दारूविक्री करत आहेत, त्यांच्यावर ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल. यावेळी रेखेगाव येथील पोलिस पाटील मोताबाई नरोटे, तंटामुक्त अध्यक्ष फत्तेसिंग घोटी, गाव संघटनेच्या सदस्य महासग सावळे, मानसिंग बघेल, गिरमाजी दुधबावरे, शामराव कोहळे, पुरुषोत्तम भांडेकर, अक्षय नरोटे, हरसिंग घोटी, रेवसिंग पडवाल, विशाल मांडवे, गुरुदास गामाई, एकनाथ पिपरे, मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे, विनोद पांडे यांच्यासह गावातील महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button