
गोंदिया : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग आला आहे. २० जून ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात एकूण ११ लाख २३ हजार ८०५ मतदारांच्या माहितीचे डिजिटायझेशन करण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी आतापर्यंत ३१.३१% मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, १०० टक्के काम करणाऱ्या चार उत्कृष्ट बीएलओ (BLO) कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच, ज्या कर्मचाऱ्यांच्या कामात अद्याप प्रगती दिसलेली नाही, त्यांनी तात्काळ कामात सुधारणा न केल्यास प्रशासकीय कारवाईचा कडक इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी १० ते १२ जुलै दरम्यान जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि नगरपालिका/नगर पंचायत कार्यालयांमध्ये विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले होते. या विशेष मोहिमेमुळे १३ जुलै पर्यंत ३,५१,८२९ मतदारांचे डिजिटायझेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
आपल्या भागात १०० टक्के डिजिटायझेशनचे काम पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या श्रीकांत तागडे (शिक्षक): BLO भाग क्र. २६५, कोटजांभोरा (तहसील- देवरी, आमगाव विधानसभा क्षेत्र), राहुल काकडे (ग्राम महसूल अधिकारी): BLO भाग क्र. २९२, धवलखेडी (तहसील- देवरी, आमगाव विधानसभा क्षेत्र), पंकजकुमार असाटी (जि. प. प्राथमिक शिक्षक): BLO भाग क्र. २०८, भजेपार (तहसील- तिरोडा, तिरोडा विधानसभा क्षेत्र), कैलास जी. पाटील (ग्रामपंचायत अधिकारी): BLO भाग क्र. १२४, गुमाधावडा (तहसील- तिरोडा, तिरोडा विधानसभा क्षेत्र) या चार कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व १२८५ ‘BLO’ पूर्णपणे प्रशिक्षित असून, फॉर्म वितरणाचे काम ९६.०३% पूर्ण झाले आहे. त्यापैकी 32.38% फॉर्म डिजिटाईज झाले आहेत. सुमारे 32.36% फॉर्म BLO कडून पडताळले गेले आहेत. Self Mapping 15.94% तर Progeny Mapping 16.12% नोंदवले गेले आहे. अनियमितता (Anomalies) 2.66% इतकी आढळली आहे. तालुकानिहाय कामगिरीत आमगाव आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यांनी कामाचा वेग चांगला राखला असून, इतर भागातही प्रक्रिया वेगाने प्रगतीपथावर आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींचा (BLA) सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची एक महत्त्वाची बैठक १६ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मोहिमेच्या प्रगतीची माहिती दिली जाणार असून, राजकीय पक्षांच्या विविध शंकांचे निरसन केले जाईल.
“नागरिकांनी आपला सर्व तपशील अचूक भरून आपल्या भागातील बीएलओ (BLO) कडे तात्काळ जमा करावा, जेणेकरून मतदार यादी अधिक शुद्ध आणि पारदर्शक होईल,” असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे. नागरिकांना या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेबाबत काही अडचण किंवा तक्रार असल्यास जिल्हा प्रशासनाने २४ तास सुरू राहणारी हेल्पलाईन जाहीर केली आहे. नागरिक ०७१८२-२३६१४८ किंवा १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.



