
कोरची तालुक्यातील पांढरीगोटा गावावर शोककळा; दोन निरागस चिमुकल्यांचे छत्र हरपले
कोरची : तालुक्यातील पांढरीगोटा गावातील एका ३० वर्षीय तरुण मातेच्या अकाली निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या इमला दशरथ पोरेटी यांचे गडचिरोली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. इमला यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी (केवळ ६ ग्रॅम) झाले होते. त्यांच्या या अकाली जाण्याने चार वर्षांचा विहान आणि अवघी दोन वर्षांची वैदेही या दोन निरागस चिमुकल्यांच्या डोक्यावरील आईची माया कायमची हरपली आहे.
मृत इमला पोरेटी यांचे पती दशरथ पोरेटी हे अल्पभूधारक शेतकरी असून तुटपुंज्या शेतीवर कुटुंबाचा गाडा चालवतात. इमला या २७ आठवड्यांच्या (सुमारे ६ महिने) गर्भवती असताना त्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण प्रचंड घटले होते. सततच्या अशक्तपणामुळे प्रकृती खालावल्याने त्यांना १३ जुलै रोजी कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील प्रथमोपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पाठवले. जिल्हा रुग्णालयात त्यांना दोन पिशव्या रक्तही चढवण्यात आले व डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
या दुर्दैवी घटनेमुळे दुर्गम व ग्रामीण भागातील गर्भवती महिलांच्या आरोग्य सेवा, नियमित तपासणी आणि वेळेवर मिळणाऱ्या उपचारांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इमला यांना योग्य वेळी आवश्यक पोषण आणि वैद्यकीय उपचार मिळाले असते, तर कदाचित हा जीव वाचला असता, अशी आर्त हळहळ पांढरीगोटा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. आई गमावलेल्या त्या दोन लहान मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून गावकऱ्यांचेही डोळे पाणावले असून, संपूर्ण पोरेटी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
“इमला पोरेटी या २७ आठवड्यांच्या गर्भवती होत्या. रुग्णालयात आणले तेव्हा त्यांचे हिमोग्लोबिन ६ ग्रॅम इतके खालावलेले होते. प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने गडचिरोली येथे हलवण्यात आले होते, मात्र तेथे उपचार सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.”
— डॉ. विनोद मडावी (तालुका आरोग्य अधिकारी, कोरची)



