
अविरल फिल्म्सतर्फे कलावंत सन्मान सोहळा : कुंतल खोजरे यांचाही विशेष सत्कार; ‘गोष्ट सुरू होते’ या आगामी चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
नागपूर : अविरल फिल्म्स आयोजित भव्य ‘कलावंत सन्मान सोहळ्या’त मराठी चित्रपट ‘मी हनुमंत रिक्षावाला’ मधील अत्यंत प्रभावी आणि दमदार अभिनयासाठी कलावंत चिरंजीव किश्टय्या गड्डमवार यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपुरात पार पडलेल्या या रंगतदार सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवर, कलाकार आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निर्माते विनोद जैस्वाल आणि दिग्दर्शक हमीद पटेल यांच्या ‘मी हनुमंत रिक्षावाला’ या चित्रपटातील चिरंजीव गड्डमवार यांच्या नैसर्गिक व भावस्पर्शी अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून विशेष कौतुक झाले होते. याच कामगिरीची दखल घेत त्यांना अविरल फिल्म्सतर्फे हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना गड्डमवार यांनी, हा सन्मान चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, सर्व सहकलाकार, तंत्रज्ञ, आपले कुटुंबीय आणि प्रेक्षकांच्या प्रेमाला समर्पित केला. याच सोहळ्यात कला क्षेत्रातील योगदानाबद्दल कुंतल खोजरे यांचाही सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
दरम्यान, अस्तित्व स्टुडिओ फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट “गोष्ट सुरू होते” या चित्रपटाच्या रिलीजचे (प्रदर्शनाचे) नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. या चित्रपटाचे निर्माते चिरंजीव किष्टय्या गड्डमवार, कुंतल खोजरे, गजानन गेडाम आणि ज्ञानेश्वर मोथे हे असून, या चित्रपटाबाबत सध्या सिनेसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावल्याबद्दल चिरंजीव किश्टय्या गड्डमवार, विशेष सत्काराबद्दल कुंतल खोजरे तसेच आगामी ‘गोष्ट सुरू होते’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर सध्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



