भंडाराविदर्भ

विकसित भारतासाठी युवकांनी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करावी – जिल्हाधिकारी सावन कुमार

जिल्हास्तरीय युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक ; पोर्टल नोंदणी अभियानाच्या पोस्टरचे अनावरण

भंडारा : देशाला ‘विकसित भारत’ बनवण्याच्या ध्येयामध्ये युवकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, तरुण पिढीने mybharat.gov.in या ‘माय भारत’ पोर्टलवर मोठ्या संख्येने आपली नोंदणी करावी, असे आवाहन भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले. ‘माय भारत’ केंद्राच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक १६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली; त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण सूचना दिल्या. “सध्याच्या काळात नशामुक्ती, रस्ता सुरक्षा अभियान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यांसोबतच युवकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले. याशिवाय राष्ट्रीय सेवा योजना (NSS), एनसीसी (NCC), भारत स्काउट अँड गाईड्स आणि ‘माय भारत’ या सर्व संघटनांच्या संयुक्त प्रयत्नातून युवकांसाठी वर्षाभरात व्यापक व प्रभावी उपक्रम राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते ‘माय भारत’ पोर्टल नोंदणी अभियानाच्या विशेष पोस्टरचे अधिकृत अनावरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान जिल्हा युवा अधिकारी सुशील भड यांनी वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा सविस्तर आराखडा सादरीकरणाद्वारे सभागृहापुढे मांडला.

या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एच. के. बदर, जिल्हा एनसीसी नोडल अधिकारी लेफ्टनंट जे. आर. किशन, जे. एम. पटेल कॉलेजचे NSS कार्यक्रम अधिकारी भोजराज श्रीरामे, समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे विजय जाधव, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे विजय पांडव, जिल्हा युवा अधिकारी सुशील भड यांच्यासह ‘माय भारत’ भंडारा चे स्वयंसेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button