
घुसखोरीविरोधी मोहिमेत दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद; मरारटोला गावावर अन् संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा
गडचिरोली : देशाच्या सीमांचे रक्षण करताना जिल्ह्याच्या सुपुत्राने मातृभूमीसाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. कुरखेडा तालुक्यातील मरारटोला येथील रहिवासी तथा सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान सुरेश दुर्गु आंबडर (वय ३५) यांना पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरीविरोधी मोहिमेदरम्यान २३ जुलै रोजी वीरमरण आले. या दुर्दैवी वृत्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यावर तीव्र शोककळा पसरली आहे.
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफकडून अत्याधुनिक रडार, स्पीड बोटी आणि फ्लोटिंग सीमा चौक्यांच्या माध्यमातून विशेष गस्त मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेदरम्यान संशयित दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात जवान सुरेश आंबडर गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अवघ्या ७० घरांची अन् ३०० लोकसंख्या असलेल्या मरारटोला या छोट्याशा गावातून सुरेश यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर बीएसएफमध्ये स्थान मिळवले होते. आपल्या शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष सेवेमुळे त्यांनी दलात विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे.
गृह मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाली असून जिल्हा प्रशासन शहीद जवानाच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली. शहीद सुरेश आंबडर यांचे पार्थिव लवकरच त्यांच्या मूळ गावी मरारटोला येथे आणले जाणार असून त्यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.



