
१५ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या मोहिमेत शाळा, महाविद्यालये व ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन
गोंदिया : केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत चालणाऱ्या ‘मेरा युवा भारत’ (माय भारत) उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील युवकांच्या सहभागाला चालना देण्यासाठी जिल्हा सल्लागार समितीची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षतेवरून बोलताना जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांना या व्यासपीठाशी जोडण्यासाठी “माय भारत” नोंदणी अभियानाला गती देण्याचे निर्देश दिले.
बैठकीदरम्यान ‘मेरा युवा भारत’ गोंदियाचे उपसंचालक सौरभ निषाद यांनी माय भारतच्या वार्षिक कार्ययोजनेची (Annual Action Plan) सविस्तर माहिती सादर केली. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध युवक-केंद्रित उपक्रमांची माहिती देताना, या उपक्रमांद्वारे तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव देणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम: माय भारत पोर्टलवर सुरू असलेल्या नोंदणी अभियानाचा आढावा घेण्यात आला. १५ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत जास्तीत जास्त युवकांनी नोंदणी करावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे सांगण्यात आले. शाळा व महाविद्यालयांवर भर: शाळा, महाविद्यालये, तसेच ग्रामस्तरावर विशेष उपक्रम राबवून थेट तरुणांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सक्षम व्यासपीठ: तरुणांना विविध संधी, योग्य मार्गदर्शन आणि राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी ‘माय भारत’ हे एक अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.
जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील तरुण-तरुणींनी ‘माय भारत’ (MY Bharat) पोर्टलवर मोठ्या संख्येने आपली नोंदणी करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी अभियानाचा व विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बैठकीस विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते.



