गडचिरोलीराजकीयविदर्भ
गावागावात ‘प्रतिसरपंच’! आजाद समाज पार्टीचा संघटन विस्ताराचा मास्टरप्लॅन, ४५७ ग्रामपंचायती आणि १,६८८ गावांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार; जनतेच्या प्रश्नांसाठी स्थानिक पातळीवर संघर्ष उभारणार
४५७ ग्रामपंचायती आणि १,६८८ गावांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार; जनतेच्या प्रश्नांसाठी स्थानिक पातळीवर संघर्ष उभारणार

गावागावात ‘प्रतिसरपंच’! आजाद समाज पार्टीचा संघटन विस्ताराचा मास्टरप्लॅन
४५७ ग्रामपंचायती आणि १,६८८ गावांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार; जनतेच्या प्रश्नांसाठी स्थानिक पातळीवर संघर्ष उभारणार
गडचिरोली,दि . ३१ ऑगस्ट : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजाद समाज पार्टीने गडचिरोली जिल्ह्यात संघटन विस्तारावर विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ४५७ ग्रामपंचायती आणि १,६८८ गावांमध्ये पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी ‘प्रतिसरपंच’ ही संकल्पना राबविण्याची घोषणा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केली.
पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी बैठकीत या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. गावागावात पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता तयार करण्यासोबतच स्थानिक नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘प्रतिसरपंच’ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
‘प्रतिसरपंच’ हा केवळ पक्षाचा पदाधिकारी न राहता गावातील जनतेचा आवाज आणि स्थानिक प्रश्नांचा पाठपुरावा करणारा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. गावातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार, शासकीय योजनांचा लाभ, ग्रामपंचायतीचा कारभार तसेच नागरिकांच्या मूलभूत समस्यांची माहिती घेऊन संबंधित यंत्रणेकडे त्यांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.
“गावात प्रश्न असतील, तर प्रतिसरपंच तिथे पोहोचेल,” अशी भूमिका पक्षाने मांडली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागापर्यंत संघटन पोहोचविण्याचा पक्षाचा मानस आहे. ‘प्रत्येक गावात संघटन, प्रत्येक प्रश्नावर आंदोलन’ या भूमिकेतून स्थानिक पातळीवर सक्षम आणि संघर्षशील नेतृत्व तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले. त्यांच्या मते, सत्तेच्या राजकारणापेक्षा जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून गावपातळीवर काम करण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार आहे.
गावातील सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या तसेच सक्रियपणे काम करणाऱ्या तरुण-तरुणींनी ‘प्रतिसरपंच’ पदासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी केले. जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना गावनिहाय प्रतिसरपंच नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
नियुक्त करण्यात येणाऱ्या प्रतिसरपंचांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रभावी कामकाजाचे प्रशिक्षण देण्यासाठी पक्षाच्या वतीने दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात ग्रामपातळीवरील प्रश्न, प्रशासनाशी समन्वय, नागरिकांच्या समस्या, संघटनात्मक कामकाज आणि आंदोलनाची दिशा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. विविध क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शकांना शिबिरासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचे पक्षाने सांगितले. दरम्यान, बैठकीदरम्यान काही नागरिकांनी आजाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केला. आगामी काळात त्यांच्या कार्यक्षमतेनुसार संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
बैठकीला प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हा संघटक हंसराज उराडे, युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष चेतन काटेंगे, डॉ. प्रशांत सातार, महासचिव अंकुश कोकोडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, महिला सचिव शोभा खोब्रागडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी, धानोरा तालुकाध्यक्ष किशोर उसेंडी, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम, गडचिरोली महिला तालुकाध्यक्षा सविता बांबोळे यांच्यासह अश्विनी रायपुरे, हरीश वाकडे, नितीन दुर्गमवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



