चंद्रपूरविदर्भ

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू ; सातजण जखमी

सावली : पिसाळलेल्या रानडुकराने शेतीची कामे करताना हल्ला केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. १७) सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास कवठी मार्गावरील शेतात घडली. आनंदराव नामदेव चौधरी (६५ रा. सावली) असे मृताचे नाव आहे. सुरेश आकुलवार (६५) हा गंभीर जखमी झाल्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. एकाच दिवशी सात जणांना जखमी केल्याने शहरात दहशत पसरली आहे.

सध्या शेतीची कामे सुरू आहेत. आकुलवार कुटुंबीय शेतात असताना रानडुकराने सुरेश आकुलवार, निर्मला आकुलवार व स्वप्नील आकुलवार यांच्यावर हल्ला केला. यात सुरेश आकुलवार गंभीर जखमी झाले. दरम्यान, या डुकराने कवठी येथून विश्वशांती विद्यालयात येणाऱ्या तन्नु नायबनकर (१८), केशवी पाल (१८), दुर्गा दहेलकार (१८) या तीन विद्यार्थिनींना जखमी केले. त्यानंतर या रानडुकराने पंचायत समितीजवळील शेतात काम करणारे आनंदराव चौधरी यांच्यावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी केले.

नागरिकांनी तातडीने सर्वांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना आनंदराव चौधरी यांचा वाटेतच मृत्यू झाला. सुरेश आकुलवार यांच्यावर सामान्य रुग्णालयात तर तन्नु नायबनकर, केशवी पाल, निर्मला आकुलवार व स्वप्नील आकुलवार यांच्यावर सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुर्गा दहेलकार या विद्यार्थिनीला सुटी देण्यात आली.

वन विभागाने मृत आनंदराव चौधरी यांच्या कुटुंबाला व जखमी सुरेश आकुलवार यांना २५ हजारांची तातडीची मदत दिली. पुढील तपास सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, क्षेत्रसहायक राजू कोडापे, वनरक्षक एल. एस. आखाडे व ठाणेदार जीवन राजगुरू करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button