चंद्रपूरविदर्भ

घरात शिरून बिबट्याचा हल्ला ; तिघे जखमी

सावली तालुक्यातील पालेबारसा येथील घटना

चंद्रपूर : शेतात चिखलणी करून घरी जेवणासाठी आलेल्या मजुरांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला चढविला. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झालेत. ही घटना शनिवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास सावली तालुक्यातील पालेबारसा येथे घडली. जखमींना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये नेताजी गणपत कावळे (५२), लोमेश नेताजी कावळे (२०) या बापलेकासह माधव डोनू मेश्राम (६५) यांचा समावेश आहे. या खळबळजनक घटनेने पालेबारसा गाव हादरून गेले आहे.

जखमींमध्ये नेताजी गणपत कावळे (५२), लोमेश नेताजी कावळे (२०) या बापलेकासह माधव डोनू मेश्राम (६५) यांचा समावेश आहे. सावली तालुक्यातील पालेबारसा गावात भरदिवसा नेताजी कावळे यांच्या घरात घुसून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरडा केल्याने मुलगा लोमेश हा धावून आला. त्यामुळे बिबट्याने झडप घेत त्याच्यावरही हल्ला चढवला. त्यानंतर शेजारी लाठ्या काठ्या घेऊन येताच बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. यात माधव मेश्राम हा जखमी झाला. जखमींमध्ये कुणाच्या मानेवर, कुणाच्या हाताला, तसेच डोळ्यावर बिबट्याने पंजा मारून जखमी केले आहे.

गत दोन दिवस आधी बिबट्याने गोठ्यातील जनावरांना ठार केल्याची घटना घडली होती. त्यामुळे आधीच भेदरलेल्या गावकऱ्यांसमोर पुन्हा गावात येऊन दिवसाढवळ्या बिबट्याने हल्ला करून दहशत निर्माण केली आहे. दोन दिवसांपूर्वी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावले होते. परंतु या पिंजऱ्यात बिबट्या अडकला नाही. पिंजऱ्याला हुलकावणी देत दिवसाढवळ्या बिबट्याने घरात घुसून हल्ला केल्याने गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची चमू दाखल झाली असल्याचे सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button