मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून आजारग्रस्त मुलीला आर्थिक मदत

अहेरी : नजीकच्या बोरी येथील इयत्ता तिसऱ्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी स्नेहा बाबुराव पुल्लीवार हिला ब्रेन ट्यूमर झाल्याने तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उपचार घेण्यास अडचण निर्माण होत आहे. ही बाब महागाव येथील सामाजिक कार्यकर्ते चेतन दुर्गे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सांगितली. वेळीच ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी स्नेहाला उपचारासाठी आर्थिक मदत केली.
ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी स्नेहाला प्राथमिक तपासणी व उपचार केल्यावर वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढचे उपचार करू, घाबरण्याचे कोणतेच कारण नाही सर्व व्यवस्थित व सुरळीत होईल, असे म्हणत स्नेहाला आत्मविश्वास दिला.
स्नेहा पुल्लीवार शिक्षणात हुशार असून ब्रेनट्यूमरमुळे चिंताग्रस्त होती. मात्र मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांची साथ मिळाल्याने स्नेहाची चिंता दूर झाली असून आरोग्य तंदुरुस्त व सुदृढ होण्यासाठी स्नेहाची आशा आता पल्लवित झाली आहे.
याप्रसंगी स्नेहा पुल्लीवार या विद्यार्थीनीसोबत स्नेहाचे काका राहुल पुल्लीवार, चेतन दुर्गे, हनमंतु चेनुरवार, साईनाथ अल्वलवार आदी उपस्थित होते.



