
चंद्रपूर : मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांना महावितरणतर्फे दरमहा वीज बिल तयार होताच ऑनलाईन पाठविण्यात येते. चंद्रपूर परिमंडळात सर्व वर्गवारीतील 8 लाख 62 हजार 929 पैकी 7 लाख 81 हजार 80 अर्थात 90.51 टक्के ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदविलेला आहे.
महावितरणने काही वर्षांपूर्वी केंद्रीकृत बिलिंग प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी मोबाईल ॲपद्वारे प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला लघुदाब वीज ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेतले जाते. त्यानंतर केवळ चार ते पाच दिवसात वीज बिल तयार करून ते मोबाईलवर एसएमएस किंवा ई-मेलद्वारे ग्राहकाला पाठविले जाते. त्यासाठी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची महावितरणकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे अशा ग्राहकाला मोबाईल क्रमांक व ई-मेल या दोन्हीवर दरमहा वीजबिल मिळविता येईल. चंद्रपूर मंडलातील 4 लाख 83 हजार 789 वीज ग्राहकांपैकी 4 लाख 49 हजार 155 ग्राहकांनी अर्थात 92.84 टक्के ग्राहकांनी, व गडचिरोली मंडलातील 3 लाख 79 हजार 140 वीज ग्राहकांपैकी 3 लाख 31 हजार 925 ग्राहकांनी अर्थात 87.55 टक्के ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. सुविधेसाठी ग्राहकांनी अचूक मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी नोंदवावा.
विज बिलांच्या तारखेपासून ७ दिवसात भरणा केल्यास एक टक्का प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट मिळेल. त्याची तारीख वीजबिलात नमूद असते. एसएमएस किंवा इ-मेल वर विजबिल घेतल्यास ही सूट मिळविणे अधिक सोयीचे आहे. मोबाईल क्रमांक नोंदणी केल्यास पूर्वनियोजित देखभाल-दुरुस्ती, खंडित वीजपुरवठ्याची माहिती, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख, व युनिटची संख्या, वीज बिलाची रक्कम, देय दिनांक, वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस याची उर्वरित माहिती मोबाईलवर येते. त्यामुळे सर्व ग्राहक तसेच जे विजवापरकर्ते, भाडेकरू यांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन चंद्रपूर परिमंडळ महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
महावितरणच्या संकेतस्थळावरून किंवा महावितरण ॲपद्वारे मोबाईल क्रमांक व ई-मेल ची नोंदणी करण्याची सोय आहे. वीज ग्राहकांनी आपल्या ग्राहक क्रमांकाची माहिती टाईप करून 9930399303 या क्रमांकावर sms केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. तसेच 24 तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक 1912 किंवा 1800-22-3435 किंवा 1800-23-3435 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येते.



