शिक्षकदिनी १३ शिक्षकांचा जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मान
नियोजन भवनात सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील ८० शाळांचाही गौरव
गडचिरोली : जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त १३ शिक्षक व मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या शाळांचा सन्मान ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. डॉ. नामदेव किरसान होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी संजय दैने, जि.प. सीईओ आयुषी सिंह, विशेष अतिथी म्हणून माजी आमदार हरिराम वरखडे, तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एम. भुयार, डायटचे प्राचार्य बळीराम चौरे, कार्यकारी प्राचार्य धनंजय चापले, अभियंता विनोद उद्दरवार, उपअभियंता (यांत्रिकी) नितीन पाटील, शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) बाबासाहेब पवार, उपस्थित होते.

सोहळ्यात प्राथमिक गटातून १२ तर माध्यमिक गटातून १ अशा एकूण १३ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये घनश्याम हटेवार, थलाश धाकडे, साधना भुरसे, गुरुदेव मेश्राम, गौरव कावळे, जितेंद्र रायपुरे, आशिष येल्लेवार, दीपक मंडल, वाल्मिकी वन्नेवार, जगन्नाथ बडगे, रवींद्र येमसलवार, श्रीनिवास रंगू, एन.आर. मरस्कोल्हे या शिक्षकांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ४ केंद्र प्रमुखांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षणाधिकारी अमरसिंह गेडाम यांनी केले तर आभार उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे यांनी मानले.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेतून एकूण ४० शाळा तर खासगी व उर्वरीत शिक्षण संस्थेतून एकूण ४० शाळा अशा एकूण ८० शाळांचा सन्मान करून कौतुकाची थाप दिली.



