समस्त सक्षमीकरण संस्थेच्या वतीने ‘गुड टच-बॅड टच’ विषयी जागृती

शालेय विद्यार्थ्यांकरिता कार्यशाळेचे आयोजन
गडचिरोली : बालवयात कोणत्याही अनुचित प्रकारांना, लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी किंवा अनैसर्गिक कृत्य टाळण्यासाठी बालवयातच चांगला-वाईट स्पर्श बालकांना समजल्यास बऱ्याच लैंगिक शोषणाच्या घटना टाळल्या जाऊन भविष्यातील मानसिक आघाताला आळा घालता येऊ शकतो. समाजातील विकृत मानसिकता असणाऱ्या व्यक्तींपासून बालकांचे संरक्षण जागरुकतेने केल्यास अनेक लैंगिक शोषणाच्या अत्याचाराला टाळता येऊ शकतो.
या विचाराने “आभाळा एवढ्या विचारापेक्षा कणभर कृती श्रेष्ठ” या तत्त्वाने समस्त सक्षमीकरण बहुउद्देशीय विकास संस्था समाजात जागृतीपर उपक्रम राबवित असते. त्यात शैक्षणिक, बालकांचे आरोग्य विषयक, क्रीडा, पर्यावरण कायदेविषयक उपक्रम मागील काही वर्षापासून संस्था राबवित आहे. त्या दृष्टीने लैंगिक अत्याचाराच्या समाजातील वाढत्या घटना देशभरात बघायला मिळत आहेत. समाजातील विदारक सत्य बालकांवर होणाऱ्या शारीरिक शोषणाचे प्रकार यांना आळा घालणे ही प्रत्येक जागरूक पालकांची, शिक्षकांची, नागरिकांचे प्रथम कर्तव्य असायला हवे. त्याला आपण ग्रामीण, शहरी भागात शालेय स्तरावर जागृतीपर “गुड टच आणि बॅड टच” काय असते? ही कार्यशाळा घेऊन टाळू शकतो. या उद्दिष्टाला समोर ठेऊन शाळेत जागृती अभियान संस्थेतर्फे राबविण्यात येणार आहे. त्यातील पहिली जागृतीपर कार्यशाळा स्कूल ऑफ स्कॉलर्स, लांजेडा येथे घेण्यात आली.
सदर कार्यशाळेला प्रिन्सिपल अजय लांडगे, वाईस प्रिन्सिपल शैलेश आकरे, सुपरवायजर वैशाली भरडकर, शिक्षिका वैशाली ठाकरे आदी उपस्थित होते.
“गुड टच व बॅड टच” या एक दिवसीय कार्यशाळेत संस्थेच्या अध्यक्षा अॅड. भावना लाकडे, समुपदेशक चित्रलेखा वाकुडे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे व व्हिडिओ ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सदर विषय विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन स्मिता गावंडे यांनी केले तर आभार दिक्षा रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवक कार्यकर्ते प्रवीना लाडवे, डिंपल चुनारकर, श्रेयश सयाम यांनी विशेष जबाबदारी पार पाडली.



