गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

मुरुमगाव परिसरात अवैध रेती तस्करीचा सुळसुळाट

महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे बुडतोय शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल; नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी

धानोरा : धानोरा तालुक्यातील मुरुमगाव ग्रामपंचायत परिसरात अवैध रेती तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक ट्रॅक्टर चालक रॉयल्टीशिवाय, विशेषतः घरकुल योजनांच्या नावाखाली, मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करत आहेत. या परिसरात खासगी ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात बांधकाम कामे सुरू असून, ट्रॅक्टर चालक मोठ्या दराने पैसे घेऊन या ठेकेदारांना रेती पुरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुरुमगाव व परिसरातील ट्रॅक्टर चालकांकडे कोणत्याही प्रकारचे रॉयल्टीचे कागदपत्र नसून, हे सर्व व्यवहार चोरीछुपे सुरू आहेत. पन्नेमारा ग्रामपंचायत हद्दीतील नदीघाटावरून रेतीचे अवैध उत्खनन करून ती रेती मुरुमगावमध्ये आणली जाते.

महसूल संकुल मंडळ कार्यालय मुरुमगाव येथे असूनही, मंडळ अधिकारी व तलाठी वर्ग मुख्यालयात नियमितपणे अनुपस्थित असतात. केवळ मंगळवार व शुक्रवार या दोनच दिवशी त्यांची कार्यालयात उपस्थिती असते. यामुळे ट्रॅक्टर चालकांना अवैध रेती तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात नसल्याने शासनाच्या महसूल विभागाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

या गंभीर समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने या विषयावर चर्चा करून कठोर कार्यवाही करावी, तसेच अधिकारांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून शासनाचे राजस्व वाचवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. महसूल विभागाच्या या दुर्लक्षामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button