
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहयोगिनींचा गौरव ; ‘फूड व्हॅन’च्या चाव्यांचे हस्तांतरण आणि ५० फळझाडांच्या रोपांचे वाटप
भंडारा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (माविम) अंतर्गत ‘सबला लोकसंचालित साधन केंद्र, साकोली’च्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे भव्य आयोजन वरठी येथे करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा विभा खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देण्यात आला. याप्रसंगी विविध बँकांच्या माध्यमातून महिला बचत गटांना लाखो रुपयांच्या आर्थिक सहाय्याचे धनादेश आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ‘फूड व्हॅन’च्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे दिमाखदार उद्घाटन ‘माविम’ भंडाराच्या उपव्यवस्थापक संगीता भोंगडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी, साकोलीच्या नगराध्यक्षा देवश्री कापगते आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून माविमचे सहाय्यक सनियंत्रण अधिकारी प्रफुल्ल अवघड उपस्थित होते.
सभेदरम्यान उपस्थित महिलांना उद्योजकता विकास आणि आर्थिक सक्षमीकरणाबाबत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये पंचायत समिती साकोलीच्या कृषी विस्तार अधिकारी अनिता, पशुवैद्यकीय अधिकारी लीना थोटे, महिला व बालविकास विभागाचे विलास भेंडारकर, पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. अनु विजय वररकर, आयसीआयसीआय बँकेचे मंगर सर आणि एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक सचिन फुटाणे यांनी शासकीय योजना व बँक कर्जाविषयी सविस्तर माहिती दिली. या सभेमध्ये ‘व्हेंडर शॉप’ प्राप्त केल्याबद्दल उद्योजक महिला रोशनी राऊत (सेंदूरवाफा) व छाया वंजारी (सातलवाडा) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महिला बचत गटांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध बँकांच्या सहकार्याने धनादेश सुपूर्द करण्यात आले: राधाकृष्ण गट, परसोडी: एचडीएफसी बँकेमार्फत ९ लाख रुपये. सुजाता गट, विर्शी: ४ लाख ९० हजार रुपये. निकिता टेबरे: आयसीआयसीआय बँकेमार्फत १ लाख रुपयांचे ‘एमई’ कर्ज. सावित्री गट, खंडाळा: ३० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य. याशिवाय, ग्रामीण भागात व्यवसाय सुरू करण्यासाठी फूड व्हॅन मंजूर झालेल्या ‘जय अंबे गट’ (परसोडी) आणि ‘खुशी गट’ (भंडारा) यांना मान्यवरांच्या हस्ते वाहनांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.
महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज मिळवून देण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल सहयोगिनी कुमुद नंदेश्वर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी विविध गटांना सुमारे २ कोटी ९ लाख ५२ हजार ७४ रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना १० हजार रुपयांचा प्रोत्साहन धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच सहयोगिनी प्रणिता हुमणे यांनाही २ हजार ६०० रुपयांचा प्रोत्साहन धनादेश देऊन गौरविण्यात आले.
केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक व पर्यावरण पूरक जबाबदारी पार पाडत, सभेत उपस्थित सर्व आरजीबींना त्यांच्या गावांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी आवळा, चिंच, सीताफळ आदी फळझाडांची प्रत्येकी ५० रोपे वाटण्यात आली.
या सभेला माजी अध्यक्षा प्रमिला चांदेवार, सीएमआरसीच्या सचिव वर्षाताई मेश्राम यांच्यासह विविध गावांतील ग्रामसंघ प्रतिनिधी, व्यवस्थापक, लेखापाल, उपजीविका सल्लागार, सहयोगिनी, सीआरपी, बँक सखी आणि महिला बचत गटांच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नेटके आयोजन व सूत्रसंचालन सबला लोकसंचालित साधन केंद्राच्या चमूने केले.



