गडचिरोलीविदर्भ

गॅस सिलेंडरबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका ; जिल्ह्यात एलपीजीचा पुरेसा साठा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

काळाबाजार व अवैध साठवणुकीविरोधात प्रशासनाची विशेष मोहीम ; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

गडचिरोली : इराण–इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरबाबत काही अफवा समाजमाध्यमांवर पसरत असल्याचे दिसून येत असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले आहे. जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची घाबराट न बाळगता अनावश्यक साठेबाजी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांकडे घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे गॅस तुटवड्याच्या अफवा पसरविणे अथवा त्यावर विश्वास ठेवणे टाळावे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने गॅस सिलेंडरचा काळाबाजार, अवैध साठवणूक आणि गैरवापर रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. विविध तालुक्यांमध्ये विशेष पथके नियुक्त करून तपासण्या सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांच्या हितासाठी प्रशासन सतर्क असून गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, आवश्यक तेवढाच गॅस वापरावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button