गोंदियाविदर्भ

प्रलंबीत कामांना प्राधान्य देवून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करा – पालकमंत्री बाबासाहेब पाटील

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांच्या मुलभूत व महत्वाच्या प्रलंबीत कामांना प्राधान्य देवून संबंधित यंत्रणांनी रखडलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात (ता.22) जिल्ह्यातील प्रलंबीत असलेल्या विविध विषयांबाबत संबंधित विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार प्रफुल पटेल, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, जि.प. मुख्‍य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, समृध्दी महामार्ग, रस्ते विकास, शहरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व विविध विकासाची  प्रलंबीत असलेली कामे संबंधित विभागाने निर्धारित वेळेत पूर्ण करावे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने कामे करतांना कामाची गुणवत्ता दर्जेदार असणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

खासदार प्रफुल पटेल यांनी बिरसी विमानतळापासून समृध्दी महामार्ग पर्यंत नविन रिंग रोड संदर्भातील महत्वाची कामे पूर्ण करुन लवकरात लवकर काम सुरु करण्याचे निर्देश दिले. तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्प योग्यरित्या पूर्ण करुन सुरु करण्यात यावे व सौंदड येथील राष्ट्रीय महामार्गाच्या रेल्वेलाईन जवळील काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.

सदर बैठकीत समृध्दी महामार्ग कार्य प्रगती, महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन (MRIDC) अंतर्गत कामे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHI) अंतर्गत कामे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत बांधकाम, गोंदिया शहरातील जुन्या उड्डाणपुलाचे बांधकाम, मरारटोली येथील उड्डाणपुलाचे बांधकाम, डम्पींग ग्राऊंड भूसंपादन प्रस्ताव व मंजुरी, सुभाष गार्डनचे नविनीकरण व सौंदर्यीकरण, रेलटोली परिसरातील रेल्वे पाईपलाईनच्या दुरस्तीची कामे, स्मशानभूमी सभागृह दुरुस्ती, वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत कामे, भूमीगत गटार योजनेंतर्गत कामे. सिंचन विभागांतर्गत झाशीनगर उपसा सिंचन योजनेची कामे, रजेगाव-काटी व तेढवा-शिवणी सिंचन प्रकल्पाची कामे, डांगोरली बॅरेज प्रकल्पाचे काम, निमगाव लघु प्रकल्पाचे काम. नगर परिषद अंतर्गत नविन सभागृह व नविन प्रशासकीय इमारत बांधकामाचे प्रस्ताव. आदिवासी विभागांतर्गत मुलींसाठी नविन वसतिगृहाच्या जागेचा प्रस्ताव, गोविंदपूर येथे गोंडवाना सभागृहासाठी जागेचा प्रस्ताव, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत कामे आदी विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

सभेला निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांचेसह विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button