परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी प्राचार्याने विद्यार्थिनींकडे केली शरीर सुखाची मागणी
शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील प्रकार

पालकांनी प्राचार्याला चोप देत केले पोलिसांच्या स्वाधीन
भंडारा : परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या मोबदल्यात प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडून चक्क शारीरिक सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयात घडला. हा प्रकार पुढे येताच संतप्त पालक, सामाजिक कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात जाऊन शहानिशा केली आणि त्या महाभाग प्राचार्याला चोप दिला. किरण मुरकूट असे या प्राचार्याचे नाव असून, सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
भंडाऱ्यातील हे शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधीनस्त आहे. यात एएनएम आणि जीएनएमच्या २०० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार, एएनएमच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी मागील वर्षी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना ५ व ६ नोव्हेंबरला पुन्हा परीक्षा द्यावी लागली. परीक्षेनंतर ८ नोव्हेंबरच्या रात्री पावणे दहा ते पावणे अकरा वाजताच्या दरम्यान प्राचार्य मुरकूट याने दोन विद्यार्थिनींना व्हॉट्सअॅपवर पेपर कसे गेले, याबाबत विचारणा केली. पेपर चांगले गेले. मात्र, निकालाची भीती वाटत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. त्यावर प्राचार्याने, माझी मर्जी राखणार असाल तर मी परीक्षेत पास होण्यासाठी मदत करू शकतो, असा मेसेज पाठविला, नंतर तो डिलिटही केला. विद्यार्थिनींनी या मेसेजेसचे स्क्रिनशॉट काढून पालकांना सांगितले.
दरम्यान, गुरुवारी २६ डिसेंबरला पीडित विद्यार्थिनी, पालक, सामाजिक कार्यकर्ते प्राचार्यांच्या कक्षात धडकले. झालेल्या प्रकाराबाबत विचारपूस केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त पालकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राचार्याला कक्षातच बेदम चोप दिला.
यावेळी पीडित विद्यार्थिनींनी प्राचार्यांच्या गैरकृत्याचा पाढाच उपस्थितांपुढे वाचला. प्राचार्याकडून वारंवार लज्जास्पद वागणूक दिली जाणे, अनेकदा वर्गखोलीत येऊन असभ्य भाषेत संभाषण करणे, इतर विद्यार्थिनींचे संपर्क क्रमांक मागणे, धमकावणे असे प्रकार ऐकविले. विशेष म्हणजे यावेळी रुग्णालयातील अनेक अधिकारी व शल्यचिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम उपस्थित होते. घटनेनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी प्राचार्याला ताब्यात घेत कक्षाला सील ठोकले. त्यानंतर पालकांनी विद्यार्थिनींसह पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.



