
गडचिरोली : आगामी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (भाजपा) आपला प्रचार अधिक तीव्र केला आहे. याच अनुषंगाने, मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाशेजारील पटांगण येथे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
स्थानिक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या सभेत मुख्यमंत्री फडणवीस आगामी निवडणुकीतील पक्षाची भूमिका, स्थानिक समस्या आणि शहराच्या विकासासंबंधीचे महत्त्वाचे मुद्दे मांडतील अशी अपेक्षा आहे.
या सभेला भाजपा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. निंबोरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, “या महत्त्वाच्या सभेला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच जिल्ह्यातील व शहरातील समस्त नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन केले आहे.
निवडणुकांचे वातावरण तापले असताना, मुख्यमंत्र्यांच्या या सभेला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता दिसून येत आहे.



