
गडचिरोली : वडसा रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ (रेल्वे बोगदा अंडरपास) येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतुकीवरील निर्बंधांची मुदत १० जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर मोठे खड्डे पडून पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत आहे. कामाची गुणवत्ता व मजबुती सुनिश्चित करण्यासाठी दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अनुभाग अभियंत्यांनी मुदतवाढ मागितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार २ जुलै ते १० जुलै २०२६ या कालावधीत अंडरपासच्या दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहणार आहे. मात्र, प्रवासी बसेस तसेच पाणीपुरवठा, महावितरण, दूरसंचार आणि रस्ते दुरुस्तीशी संबंधित अत्यावश्यक सेवांची वाहने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.
मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ व ११६ चे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले आहे.



