
शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी, मोफत औषध वितरण व आरोग्य योजनांचा घेतला लाभ
आमगाव : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) आमगाव शहराच्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भारतीय जनता पक्षाचे पितृपुरुष डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त २८ जून रोजी आमगाव येथील पदमपूर परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी, मोफत औषध वितरण तसेच विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
शिबिरात उपस्थित नागरिकांना आरोग्य तपासणीसोबतच आयुष्मान कार्ड व महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भातील सेवांचाही लाभ देण्यात आला. आरोग्य तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम दिवसभर उपस्थित होती. तसेच नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सल्लाही देण्यात आला.
यावेळी आमदार संजय पुराम, भाजयुमो जिलाध्यक्ष रोहित अग्रवाल, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, संपर्क प्रमुख वीरेंद्र अंजनकर, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. येशुलाल उपराडे, जिल्हा महामंत्री नरेंद्र बाजपेयी, आमगाव भाजप शहराध्यक्ष मनोज सोमवंशी, संदीप थानथराटे, सुषमा भुजाडे (अध्यक्षा, महिला मोर्चा, आमगाव शहर), सुनंदा उके (अध्यक्षा, महिला मोर्चा, आमगाव तालुका), राजेश मानकर आदी उपस्थित होते.

यावेळी भाजयुमो जिलाध्यक्ष रोहित अग्रवाल म्हणाले की, भारतीय जनता युवा मोर्चा ‘सेवा ही संघटन’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून समाजहित व जनसेवेच्या कार्यात सातत्याने सक्रिय आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजयुमो सातत्याने प्रयत्नशील आहे. आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य यांसारख्या योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य संरक्षणाचे प्रभावी माध्यम ठरत आहेत.
ते पुढे म्हणाले की, सध्याच्या काळात अशा आरोग्य तपासणी शिबिरांची गरज अधिक वाढली असून भविष्यातही अधिकाधिक ठिकाणी अशा प्रकारचे जनसेवा उपक्रम आयोजित करण्यासाठी भाजयुमो कटिबद्ध राहील.
आरोग्य शिबिरात वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉ. अनुराग बाहेकर, डॉ. गार्गी बाहेकर, डॉ. अक्षत अग्रवाल, डॉ. सतीश बन्सोडे, डॉ. शिवानी फुले, डॉ. युवराज दसरीया, डॉ. शिमेश्वरी मेश्राम आणि डॉ. गौरव पटले यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सर्व डॉक्टर, सहकारी संस्था, कार्यकर्ते तसेच उपस्थित नागरिकांचे आभार मानण्यात आले.
नागरिकांनी घेतला विविध आरोग्य सेवांचा लाभ
या आरोग्य तपासणी शिबिरात ईसीजी, मधुमेह (शुगर) तपासणी, रक्तदाब तपासणी, लिपिड प्रोफाइल, युरिक ॲसिड तपासणी, थायरॉईड तपासणी, बोन डेन्सिटी तपासणी, मोफत औषध वितरण तसेच आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कार्डांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.



