गडचिरोलीविदर्भ

मुलचेरातील ४५ गावांमध्ये अवैध दारूविक्री बंद; मुक्तिपथ आणि महिलांच्या सहभागाला यश, दारूविक्रेते वळले इतर व्यवसायांकडे, पोलीस विभागाचे सहकार्य

दारूविक्रेते वळले इतर व्यवसायांकडे, पोलीस विभागाचे सहकार्य

 

मुलचेरातील ४५ गावांमध्ये अवैध दारूविक्री बंद; मुक्तिपथ  आणि महिलांच्या सहभागाला यश,

गडचिरोली, ३ १ ऑगस्ट : मुलचेरा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर नियंत्रण मिळविण्यात मोठे यश प्राप्त झाले आहे. तालुक्यातील एकूण ६४ गावांपैकी तब्बल ४५ गावांमध्ये अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद झाली आहे. मुक्तिपथ गाव संघटन व मुक्तिपथ तालुका चमूने घेतलेल्या परिश्रमाला पोलीस विभागाचे सहकार्य लाभल्याने हे शक्य झाले आहे. या गावांमधील दारूविक्रीबंदी कायम टिकून राहावी, याकरिता संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येत असून, विविध गावांत महिलांच्या ‘शक्तिपथ’ संघटना स्थापन करून दारू बंदी अधिक प्रभावी करण्यासाठी विविध कृती करण्यात येत आहेत.
गावागावातून अवैध दारूविक्री हद्दपार करणे हे एक आव्हानात्मक कार्य होते. यासाठी मुक्तिपथ तालुका टीमने प्रत्येक गावात महिलांची संघटना स्थापन करून दारूविक्रीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. या संघटनेला वेळोवेळी मार्गदर्शन व कायद्याचे ज्ञान देऊन दारूविक्रीविरोधात लढा देण्यासाठी महिलांना सक्षम करण्यात आले. त्यानंतर विविध गावातील महिलांनी आपल्या गावातून दारूविक्री कायमची बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याकरिता गावामध्ये बैठक घेऊन दारूविक्रीबंदीचा निर्णय घेणे, मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती स्थापन करणे, दारूविक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी अहिंसक कृतीच्या माध्यमातून मुद्देमाल नष्ट करणे, पोलीस विभागाकडे दारूविक्रेत्यांविरोधात पाठपुरावा करणे आणि विविध उपक्रम राबवून संघटना मजबूत करणे आदी कार्य महिलांनी यशस्वीरीत्या पार पाडले.
वेळोवेळी दारूविक्रेत्यांना नोटीस देऊन व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. काही दारूविक्रेत्यांना मुद्देमालासह पोलिसांच्या स्वाधीन देखील करण्यात आले असून, पोलीस स्टेशनमध्ये विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे बहुतांश विक्रेत्यांनी हा अवैध व्यवसाय बंद केला आहे. मुक्तिपथ चमूने प्रत्येक वेळी महिलांना सहकार्य करीत गाव दारूमुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविल्या. आताच्या घडीला तालुक्यातील तब्बल ४५ गावांमध्ये दारूविक्रीवर नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे.
दारूविक्रेते वळले इतर व्यवसायांकडे
विविध गावांमध्ये ठोक तसेच किरकोळ दारूविक्री करणाऱ्यांविरोधात गाव संघटनेच्या माध्यमातून अनेकदा कृती करूनही काहीजण मुजोरीने अवैध व्यवसाय सुरूच ठेवत होते. मात्र, मुक्तिपथ संघटना आणि पोलीस विभागाने दारू विक्रेत्यांविरोधात सातत्याने केलेल्या कठोर कृतीमुळे त्यांना अखेर आपला अवैध व्यवसाय बंद करावा लागला. सध्या आपल्या संसाराचा गाडा सुरळीत चालविण्यासाठी हे पूर्व-दारूविक्रेते आता इतर कायदेशीर व्यवसायांकडे वळले असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस विभागाचे सहकार्य
मुलचेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बहुतांश गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्यात यश आले आहे. पोलीस विभागाकडून गाव संघटनेच्या महिलांना वेळोवेळी मोलाचे सहकार्य मिळत असल्यानेच दारूविक्रेत्यांना कायदेशीर धडा शिकविण्यात यश मिळत असल्याचे मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे व चमूने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button