
वार्षिक अनुष्ठानासोबतच आरोग्य शिबिर आणि महाप्रसादाची रेलचेल ; मल्लीक परिवारातर्फे जय्यत तयारी
गडचिरोली : येथील आयटीआय चौक, देवापूर परिसरातील श्री श्री शांतिहरि गुरुचाँद मंदिर येथे श्री श्री हरिचाँद ठाकूरजींचा २१४ वा जन्मस्मरण महोत्सव आणि १६ वे वार्षिक अनुष्ठान अत्यंत उत्साहात साजरे केले जाणार आहे. २२ आणि २३ जानेवारी २०२६ रोजी डॉ. जे.बी. मल्लीक यांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडणार असून, या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसांचा आध्यात्मिक सोहळा
२२ जानेवारी (गुरुवार): सकाळी १०:३० वाजता अधिवास, गंगापूजन आणि घटस्थापनेने महोत्सवाचा प्रारंभ होईल. सायंकाळी संध्याआरती, संकीर्तन आणि निशी जागरण-कीर्तन प्रवचनाचा भाविकांना लाभ घेता येईल. २३ जानेवारी (शुक्रवार): पहाटे ५:३० वाजता प्रभात फेरीने दिवसाची सुरुवात होईल. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मान्यवरांची प्रबोधनात्मक प्रवचने होतील. दुपारी २:४५ वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विशेष पुष्पांजली अर्पण करण्यात येईल. सायंकाळी ५:३० वाजल्यापासून महाप्रसाद व सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता होईल.
महोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवार, २३ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता ‘माउली पॅथॉलॉजी’ च्या सहकार्याने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हिमोग्लोबिन, ब्लड शुगर, ब्लड ग्रुप आणि रक्तदाब (बी.पी.) तपासणीची सुविधा सर्व भाविकांसाठी मोफत उपलब्ध असेल.
सदर महोत्सवाचे आयोजन श्री हरिगुरुचाँद सोसायटी स्किमपॉईंट, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे. डॉ. जे.बी. मल्लीक, डॉ. सुरज मल्लीक, डॉ. ज्योती मल्लीक आणि समस्त मल्लीक परिवारासह गडचिरोलीतील बंगाली समाजाने सर्व मतुआ भक्त आणि नागरिकांना या मंगलमयी सोहळ्याला आणि महाप्रसादाला उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.



