गडचिरोलीविदर्भ

कोर्ला गावात दारूविक्रेत्यांवर होणार दंडात्मक कारवाई

गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील कोर्ला येथे अवैध दारू विक्रीबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. आता दारू विक्री करताना आढळून आल्यास संबंधित विक्रेत्याकडून 5 हजारांचा पहिला दंड आकारण्यात येणार आहे.

अतिदुर्गम भागात वसलेल्या कोर्ला गावात चोरट्या मार्गाने अवैध दारूची विक्री होत असल्याने महिलांसह ग्रामस्थाना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावातून दारूविक्री बंद करण्यासाठी मुक्तीपथच्या मार्गदर्शनाखाली गाव संघटनेच्या महिलांनी विक्रेत्यांना सूचना दिल्या असल्या तरी सुद्धा मुजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. अशातच ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत अवैध दारूविक्रीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. दरम्यान गावातील महिलांनी दारूविक्रीमुळे निर्माण झालेल्या समस्या विषद करीत दारूबंदी करण्याची मागणी केली.

यावेळी सिरोंचा मुक्तिपथ तालुका चमूने हजर राहून दारूविक्रीचे नुकसान, गाव विकासावर होणारे परिणाम, अवैध दारूविक्री बंदीसाठी ग्रामपंचायतचे अधिकारी आदी मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. या गंभीर समस्येची दखल घेत दारूविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला. विक्रेत्यांना पाच दिवसांची मुदत देत पुन्हा दारूविक्री करताना आढळून आल्यास ग्रामपंचायत समितीच्या वतीने 5 हजारांचा दंड तसेच कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला. तसेच दारूविक्री विरोधात लढा देण्यासाठी समिती गठीत करण्यात आली.

सभेला सरपंच सुशीला वेलादी, ग्रामसेवक मोहनिश आत्राम, शिक्षिका चंद्रकला आलम, अंगणवाडी सेविका नंदा पुजारी, आशा स्वयंसेविका सपना आलम, रवी आलम, कमला आलम, पोलिस पाटील सडमेक, मलया दुर्गम, राजेश तोरेम, राजेश तोरेम, समया सिडाम, नारायण तलांडी, सुरेश सडमेक यांच्यासह ग्रामस्थ व मुक्तीपथ तालुका चमू उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button