
जिल्ह्यातील नद्या-नाल्यांना पूर ; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले असून, ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रशासनाने १३ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचे जाहीर केले आहे.
हेमलकसा-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्लकोटा नदी), हलवेर ते कोठी रस्ता, अहेरी-वटरा रस्ता (वटरा नाला), तळोधी-आमगाव-विसापूर राज्यमार्ग (पोहार नदी), चौडमपल्ली-चपराळा रस्ता, कुरखेडा-वैरागड राज्यमार्ग (सती नदी), काढोली ते उराडी रस्ता, पोरला-वडधा रस्ता, शंकरपूर ते डोंगरगाव रस्ता, कोकडी ते तुलशी रस्ता, कोंढाळा-कुरुड-वडसा रस्ता, भेंडाळा-बोरी-गणपूर रस्ता (हळदीमाल नाला) आणि गडचिरोली-चांदळा-गुरवळा रस्ता हे १३ मार्ग पुरामुळे वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे बंद झालेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि पुराच्या पाण्यातून प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मदतकार्य आणि बचाव पथके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.



