भंडाराविदर्भ

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर ; सन्मित्र गणेशोत्सव मंडळ, गणेशपूर जिल्ह्यात प्रथम!

५० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव ; जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते सन्मान

भंडारा : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२५’ चा जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला आहे. यात भंडारा तालुक्यातील सन्मित्र गणेशोत्सव मंडळ, गणेशपूर या मंडळाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून मानाचा लौकिक मिळविला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात विजेत्या मंडळांचा गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे समन्वयक सावन कुमार यांच्या हस्ते सन्मित्र गणेशोत्सव मंडळाला प्रथम पुरस्काराचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी मुंबई येथे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या हस्तेही या मंडळाचा गौरव करण्यात आला होता.

पुरस्काराचे निकष: सांस्कृतिक कार्य विभागाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत ही स्पर्धा घेण्यात आली होती. यात मंडळांनी राबविलेले पर्यावरणपूरक उपक्रम (शाडूची मूर्ती, नैसर्गिक रंग). सामाजिक संदेश आणि जनजागृती. सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिस्तबद्धता. या आधारावर सन्मित्र मंडळाची निवड करण्यात आली.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शकता जपण्यासाठी बक्षिसाची रक्कम थेट मंडळांच्या बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी विजेत्या मंडळाचे कौतुक करतानाच, भविष्यात इतर मंडळांनीही अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.

या सोहळ्याला निवासी उपजिल्हाधिकारी तथा निवड समितीचे अध्यक्ष मनोहर चव्हान, जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव तारकेश्वरी बोरीगिड्ढे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप दातीर, सहायक संशोधन अधिकारी पंकजा भोंगाडे यांच्यासह जिल्हा प्रशासन व सांस्कृतिक विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button