गडचिरोलीविदर्भ

महुआ प्रक्रिया उपक्रमातून ग्रामीण उपजीविकेला मिळणार बळकटी

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची कोरची तालुक्यातील विविध उपक्रमांना भेट

गडचिरोली : कोरची तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी कुटुंबांच्या उपजीविकेला शाश्वत आधार मिळावा, वनउत्पादनांमधून मूल्यवर्धित उत्पन्ननिर्मिती व्हावी, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या महुआ प्रक्रिया उपक्रमाला अधिक गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.

कोरची तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हा नियोजन समिती (DPC) निधीतून उभारण्यात आलेल्या ‘आजीविका क्लस्टर’ अंतर्गत गोंड गार्ड एफपीओ, कोरची येथील महुआ प्रक्रिया युनिटला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी पंडा यांनी “मार्च २०२५ मध्ये घेतलेले प्रशासकीय निर्णय आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत,” असे समाधान व्यक्त केले. महुआ प्रक्रिया युनिटसाठी डीपीसी निधी मंजूर करून दिल्यानंतर आज या उपक्रमातून प्रत्यक्ष उत्पादन, मूल्यवर्धन व रोजगारनिर्मिती सुरू झाली असून, याचा थेट लाभ स्थानिक आदिवासी व ग्रामीण कुटुंबांना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महुआपासून तयार होणाऱ्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे, विक्री वाढीसाठी विपणन साखळी अधिक सक्षम करणे, पॅकेजिंग व ब्रँडिंग सुधारणा तसेच ई-मार्केटिंगचा प्रभावी वापर करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या माध्यमातून स्थानिक एफपीओ आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि महुआ संकलक व शेतकऱ्यांना थेट व शाश्वत उत्पन्न मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यानंतर तहसील कार्यालय, कोरची येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची आढावा सभा घेण्यात आली. या सभेत महसूल, कृषी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, नगर पंचायत, शिक्षण, ग्रामीण विकास आदी विभागांशी संबंधित प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन ती तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले. नवीन कामांचे नियोजन लाभार्थी-केंद्रित व कालबद्ध पद्धतीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी पंडा यांनी शासकीय आश्रम शाळा, कोरची येथील वर्गखोल्या व प्रयोगशाळा बांधकामाची पाहणी केली व बांधकाम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शाळा परिसरात पिण्याच्या पाण्याची तातडीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. ग्रामीण रुग्णालय, कोरची येथे भेट देऊन औषधी साठ्यासाठी स्वतंत्र स्टॉक रूम नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली व यासाठी बांधकामाचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. प्रस्तावित एकलव्य निवासी शाळेच्या जागेची पाहणी करून जागेचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

मौजा जांभळी येथील एव्ही अंगणवाडी केंद्र, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेले सीसी रस्ता काम, स्वयंरोजगार विक्री केंद्रातील नवतेजस्विनी महिला उद्योग केंद्र स्टॉल, मा. दुर्गा आदिवासी महिला बचत गटाद्वारे चालविण्यात येणारा ‘मॉ की रोटी’ उपक्रम तसेच मौजा बेडगाव येथील झुडपी जंगल डी-लिस्टिंग प्रकरणाचीही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

या आढावा सभेस अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपविभागीय अधिकारी (कुरखेडा) प्रसन्नजित प्रधान, उपजिल्हाधिकारी (रोहयो) स्मिता बेलपात्रे, उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे यांच्यासह तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button