
विद्यार्थ्यांना डास आणि आजारांबाबत सखोल मार्गदर्शन
गोंदिया : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यात ‘डेंग्यू प्रतिरोध महिना’ साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि आश्रमशाळांमध्ये किटकजन्य आजारांबाबत जनजागृती केली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत, २४ जुलै रोजी गोरेगाव तालुक्यातील मनीभाई ईश्वरभाई पटेल महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा, सोनी येथे हिवताप-डेंग्यू आजारांबाबत विविध विषयांवर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
कीटकशास्त्रीय तंत्रज्ञ अनिल चोरवाडे यांनी मनीभाई ईश्वरभाई पटेल महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना बॅनरच्या माध्यमातून डासांचे प्रकार, त्यांपासून होणारे आजार, त्यांची लक्षणे आणि डासांचे जीवनचक्र अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना अॅनोफिलीस मादी, एडीस आणि क्युलेक्स इत्यादी कीटक ओळखण्यासंदर्भात माहिती देण्यात आली.
चोरवाडे यांनी हिवताप आजाराबाबत डासांचे जीवनचक्र, पाण्यात डासांची होणारी वाढ, डासामध्ये प्लासमोडीयम जंतूची वाढ आणि हिवताप जंतू भारीत परिपक्व प्रौढ डास मानवाला चावल्यानंतर मानवाच्या रक्तात व अवयवात आढळणारे बदल, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, हिवताप नियंत्रणासाठी लार्वा व प्रौढ डास यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. अनिल चोरवाडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक टी.जी. कोडापे, केंद्रप्रमुख यु.एम. बोपचे, शिक्षकवृंद ए.के. बिसेन, ओ.ए. राऊत, पी.एस. राठोड, एस.एस. रहांगडाले, एम.वाय. ठाकरे, व्ही.डी. पटले, जे.एच. फुले यांनी सहकार्य केले. तर, जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका एम.बी. पारधी यांच्यासोबत शिक्षक रिता पटले, ओ.डब्ल्यू. पारधी, एस.एम. वैद्य, आर.ए. राऊत, अनामिका टेंभुर्णे उपस्थित होते. आरोग्य विभागामार्फत आरोग्य निरीक्षक बी.ए. हेडाऊ, आरोग्य सहाय्यक पी.व्ही. डोंगरे, आरोग्य सेवक हर्षद नान्हे आणि आरोग्य सेविका सी.बी. घासले यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.



