
गोबरवाही पोलिसांची पाथरी फाट्यावर कारवाई
भंडारा : गोबरवाही पोलिसांनी शुक्रवार, २५ जुलै रोजी पाथरी फाटा येथे एका संशयित वाहनाची तपासणी करून सुमारे १ लाख २२ हजार रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखू आणि वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोबरवाही पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, गोबरवाही पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी पाथरी फाटा येथे सापळा रचून एका संशयित वाहनाला थांबवले. वाहनाची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणात अवैध सुगंधित तंबाखू आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी सोनू प्रल्हाद कोरमोरे (वय ३२, रा. आष्टी) याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीदरम्यान हा सुगंधित तंबाखू अंकित अग्रवाल (वय ४५, रा. पवनारखारी, ता. तुमसर) याच्या सांगण्यावरून वाहतूक करत असल्याचे सांगितले.
या कारवाईत ४ नग आकाशी रंगाच्या प्लॅस्टिक चुंगडीमध्ये १ किलो वजनाचे, एकूण ४० किलो तंबाखू पाकीट. ईगल तंबाखूचे ४० ग्रॅमचे १० पाऊच. रिमझिम तंबाखूचे प्रत्येकी एक किलो वजनाचे १० पॅकेट. या सोबतच एमएच ३६ / एके ४२२९ क्रमांकाची काळ्या रंगाची दुचाकी असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोबरवाही पोलिसांनी भारतीय न्यायसंहिताच्या कलम २७४, २७५, १२३, २२३, ४९ आणि अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-२००६ च्या कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे.



