
गडचिरोली : इतिहास विभाग व आदिवासी अध्यासन केंद्राद्वारे गोंडवाना विद्यापीठात ७ व ८ मार्च रोजी विदर्भ इतिहास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने 57 व्या विदर्भ इतिहास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
विदर्भ इतिहास परिषदेची स्थापना 1968-1969 मध्ये झाली. तेव्हा पासून आजपर्यंत या परिषदेचे अधिवेशन अव्याहतपणे सुरु आहे. विदर्भ इतिहास परिषद नागपूर, अमरावती व गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण व मान्यताप्राप्त ठरली आहे. इतिहासात होणारी नवनवीन संशोधने संशोधकांना मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असावे या ध्येयातून या परिषदेची स्थापना झाली. परिषदेच्या स्थापनेपासून आतापर्यंत परिषदेची विनाखंड होत असलेली अधिवेशने याची साक्ष देतात. विदर्भातील प्राध्यापकांना एकत्र आणण्याचे व त्यांचे विचार जाणून त्याला चालना देणारे व्यासपीठ म्हणून महत्वपूर्ण कार्य या परिषदेच्या माध्यमातून होत आहे.
आदिवासींचा इतिहास आपल्या देशात अत्यंत प्राचीन आहे. भारताच्या विविध भागांत, विशेषतः मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, गुजरात आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये आदिवासी समुदायांचे वास्तव्य आहे. आदिवासी लोकांची जीवनशैली त्यांच्याशी आंतरक्रियेमध्ये राहिलेल्या नैसर्गिक वातावरणाशी निगडीत असते. त्यांनी आपली संस्कृती, परंपरा आणि देवांची उपासना पद्धत विकसित केली आहे. त्याचबरोबर आदिवासीनी विविध कलेमध्ये आपले अस्तित्व आणि वेगळेपण टिकवून ठेवले आहे. ही कला आपणास चित्रकला, आभूषण, वस्त्र आणि घरे यात प्रामुख्याने दिसून पडते. आदिवासी संस्कृती त्यांच्या जीवनशैलीत, खाद्यसंस्कृतीत, नृत्यकला, संगितकला आणि धार्मिक परंपरांमध्ये प्रकट होते. आदिवासी समाजात सामूहिक जीवनशैली महत्त्वाची मानली जाते आणि ते आपापसात एकमेकांच्या मदतीने आपले जीवन जगतात.
आजच्या काळात आदिवासी समुदायांना अनेक समस्या भेडसावत आहेत. जसे की: आर्थिक अस्थिरता, शिक्षणाची कमतरता, आरोग्याची समस्या तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बघितल्यास आपणास दिसून येते की आदिवासी समाजाला त्यांच्या भूमीवरुन विस्थापित करणे, त्यांच्या वनांवर आक्रमण करणे आणि त्यांना त्यांच्या परंपरांपासून दूर करणे या काही महत्त्वाच्या समस्या आहेत. यावर “आदिवासी इतिहास, कला, संस्कृती आणि वर्तमान समस्या” या परिसंवादात विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे.
स्थानिक इतिहासलेखन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये एका विशिष्ट भूभागाच्या इतिहासाचे संशोधन, दस्तावेजन आणि संग्रहण केले जाते. यात स्थानिक लोकांच्या परंपरा, संस्कृती, सामाजिक संरचना आणि आर्थिक स्थिती या विषयांवर संशोधन करण्यात येते. स्थानिक इतिहास लेखनामुळे आपल्याला स्थानिक लोकांच्या परंपरा, मूल्ये आणि जीवनशैली यांचे दस्तावेजन करण्यात मदत होते, विविध समुदायांमध्ये सामाजिक समन्वय वाढतो, शाळा आणि महाविद्यालये संशोधकांसाठी महत्वाचे शैक्षणिक साधन बनते, स्थानिक इतिहास लेखनातून पर्यटन, स्थानिक उत्पादने, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची प्रचारणा होते, ज्यामुळे स्थानिक अर्थशास्त्र सुधारते.
परंतु स्थानिक इतिहासलेखन करताना दस्तावेजनाचा अभाव असतो, ज्यामुळे इतिहास शोधणे कठीण जाते. अशा अभावी खर्या इतिहासाचे संरक्षण करण्यास अडचण येते, इतिहासलेखनावर राजकीय हस्तक्षेपामुळे वास्तवता बदलली जाते. असे केल्याने सत्यता आणि वास्तवाच्या बाबतीत समस्या निर्माण होतात, स्थानिक इतिहासलेखनासाठी आवश्यक आर्थिक साधनांची कमतरता असते. यामुळे संशोधन आणि दस्तावेजन करणे कठीण होते, स्थानिक इतिहासाचा योग्य अभ्यास करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक स्रोतांची आणि साधनांची कमतरता असते. अशा अनेक आणि इतर महत्त्वाच्या मुद्यांवर “स्थानिक इतिहासलेखन : आवश्यकता आणि समस्या” या चर्चासत्रात विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे.
सदर इतिहास परिषदेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते डॉ. श्रीराम कावळे प्र-कुलगुरू व डॉ. अनिल हिरेखण, कुलसचिव यांच्या उपस्थितीत होणार आहे. परिषदेत लेखक व विचारवंत अभिजित जोग पुणे, डॉ. अनिरुद्ध देशपांडे दिल्ली विद्यापीठ, डॉ. नारायण भोसले, मुंबई विद्यापीठ, डॉ. शाम कोरेटी नागपूर विद्यापीठ, नागपूर मार्गदर्शन करणार आहेत.



