गडचिरोलीविदर्भ

ताडगाव येथील आरोग्य शिबिरात ६१ नागरिकांची मोफत तपासणी

पोलीस रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेचा संयुक्त उपक्रम; फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांच्या शौर्याची माहिती देऊन जनजागृती

भामरागड : नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहचविण्याच्या आणि पोलिसांविषयी विश्वासाचे नाते घट्ट करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाने पुन्हा एकदा आपले सामाजिक उत्तरदायित्व जपले आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने शुक्रवार, २९ मे रोजी भामरागड उपविभागातील मौजा ताडगाव येथील आठवडी बाजार परिसरात एका भव्य व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

पोलीस रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमात ताडगाव परिसरातील ६१ गरीब व आदिवासी नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून मोफत तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरविण्यात आले.

हा कल्याणकारी उपक्रम गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. ताडगावच्या आठवडी बाजारात खरेदी-विक्रीसाठी आलेल्या आणि आरोग्याविषयी अनभिज्ञ असलेल्या अतिदुर्गम भागातील नागरिकांना या शिबिराचा मोठा फायदा झाला.

यावेळी पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मडावी आणि डॉ. श्रेया कुमरे यांच्या नेतृत्वातील वैद्यकीय पथकाने ६१ नागरिकांची विविध आजारांबाबत सखोल तपासणी केली. तपासणीअंती रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले, तसेच कुपोषण व विविध हंगामी आजारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यापैकी गंभीर लक्षणे आढळलेल्या एकूण ३ नागरिकांना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जाण्याची शिफारस करण्यात आली.

गडचिरोली पोलीस दलाने केवळ कायदा व सुव्यवस्था न राखता दुर्गम भागातील जनतेसाठी राबविलेल्या आरोग्य मोहिमांचा एक कौतुकास्पद आलेख या निमित्ताने समोर आला आहे. वर्ष २०२१ पासून आजपर्यंत एकूण २०१ मेळाव्यांच्या माध्यमातून तब्बल ४२,५०० पेक्षा अधिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी. ५ मोठ्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून ४,३६१ युनिट रक्ताचे संकलन. ऑपरेशन रोशनी या अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत ९,९७१ पेक्षा जास्त नागरिकांची नेत्र तपासणी करून १,४१२ अंध व वृद्ध नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Cataract Surgery) करून त्यांना दृष्टी देण्यात आली आहे.

आरोग्य तपासणीसोबतच, आठवडी बाजारात आलेल्या नागरिकांमध्ये देशभक्ती व सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी एका विशेष फिरत्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. विविध बॅनर्स आणि पोस्टर्सच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या शहीद जवानांचे सर्वोच्च बलिदान, शौर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सी-६०’ पथकाचे कार्य आणि पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती देऊन नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.

हे शिबिर पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात ताडगावचे पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) कार्तिक दळवी व त्यांच्या पोलीस अंमलदारांच्या पथकाने या शिबिराचे नियोजन केले. या जनहितैषी उपक्रमाबद्दल संपूर्ण ताडगाव परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button