क्राईमगडचिरोलीविदर्भ

मेंढा येथील महिला हत्याकांडाचा १२ तासांत छडा ; दोन आरोपींना अटक

गडचिरोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; पूर्ववैमनस्यातून झाला होता खून

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मेंढा येथे घडलेल्या एका खळबळजनक महिला हत्याकांडाचा छडा लावण्यात स्थानिक पोलिसांना अवघ्या १२ तासांत यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि गडचिरोली पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दोन नराधमांना बेड्या ठोकल्या असून, एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले आहे.

८ मे २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास मेंढा येथील अक्षय भानारकर यांच्या घरात शामकला सुखदेव किरंगे (रा. हिंडदा, ता. कुरखेडा) या महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. भरवस्तीत झालेल्या या खुनामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळजनक वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास यंत्रणा वेगाने फिरवली.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन केले. पोलिसांनी तांत्रिक माहिती, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीचा अचूक वापर केला. संशयाची सुई सुदामा चौधरी याच्याकडे वळताच पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला चंद्रपूर येथून ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी सुदामा चौधरी याने गुन्ह्याची कबुली दिली. जुन्या वादातून आणि पूर्ववैमनस्यातून त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने शामकला यांचा खून केल्याचे कबूल केले. या माहितीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत खालील आरोपींना अटक केली: १. सुदामा रामभाऊ चौधरी (वय ३३, रा. शिरसगाव, जि. अहिल्यानगर) २. चेतन धर्माराव खोब्रागडे (रा. इंदिरानगर, गडचिरोली) यासोबतच एका विधीसंघर्षीत बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत, पोनि. विनोद चव्हाण आणि त्यांच्या चमूचा मोलाचा वाटा आहे.

अल्पावधीत आरोपींना गजाआड केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण तपास पथकाचे अभिनंदन केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button