गडचिरोलीचंद्रपूरविदर्भ

वैनगंगेत प्राण गमावणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मान्यता

चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राद्वारे करण्यात आलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ काही तासांतच या मदतीला मंजुरी दिली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी गोपाल गणेश साखरे (बुलढाणा), पार्थ बाळासाहेब जाधव (अहिल्यानगर, शिर्डी) आणि स्वप्निल उद्धवसिंह शिरे (छत्रपती संभाजीनगर) हे १० मे रोजी वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेले होते. दुर्दैवाने, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय शिक्षणाच्या सुरुवातीलाच या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या दुर्घटनेनंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या विनंतीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली.

“या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. समाजसेवेचे स्वप्न उराशी बाळगून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केलेल्या या तरुणांचे आयुष्य अचानक संपुष्टात आले. त्यांच्या कुटुंबांना शासनाकडून दिलासा मिळावा, हीच माझी भावना होती. यासाठी केलेल्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित मान्यता दिली, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे,” अशी भावना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button