गडचिरोलीविदर्भ

मुरूमबोडी येथील दारू विक्रेत्यांमुळे 14 गावातील नागरिक त्रस्त

ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव सर्वानुमते पारित

गडचिरोली : तालुक्यातील भिकारमौशी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुरूमबोडीसह बोथेडा येथे सुरू असलेल्या सर्रास दारूविक्रीमुळे दारूविक्री बंद असलेल्या 14 गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ग्रांप सभागृहात नुकतेच आयोजित ग्रामसभेत संबंधित गावातील विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला आहे. सोबतच पोलिस विभागाकडे तक्रार दाखल करण्याचेही ठरविण्यात आले.

भिकारमौशी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मुरूमबोडी गावात मोहफुलाची दारू काढून विक्री केली जाते. तसेच बाजूच्या गावात दारूचा पुरवठा देखील केला जातो. काही वेळा देशी – विदेशी दारू उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे लगतच्या बोथेडा गावातही दारू विक्री होते. परिणामी दारूविक्री बंद असलेल्या खुर्सा, गीलगाव, कुरखेडा, अंबेशिवनी, अंबेटोला, भिकारमौशी , कलमटोला, धुंडेशिवणी, अमिर्झा, उसेगाव या गावातील मद्यपी दोन्ही गावात दारू पिण्यासाठी जातात. यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येण्यासोबतच आर्थिक नुकसान, दारू विक्री बंद गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर समस्येतून गावांना अवैध दारू विक्री मुक्त करण्यासाठीं मुक्तीपथ गाव संघटना व ग्रामस्थांच्या माध्यमातून अनेकदा प्रयत्न करण्यात आले. पोलिसांनी सुद्धा सदर गावातील विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. परंतु, विक्रेत्यांनी जंगल परिसराचा आधार घेऊन आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे.

नुकतेच भिकारमौशी ग्रामसभेत भिकारमौशी, कळम टोला, मुरुमबोडी, आंबेटोला येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत अवैध दारूबंदीचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. या निर्णयाचे उल्लंघन करीत अवैध व्यवसाय केल्यास ग्रामपंचायत च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या योजनांपासून वंचित ठेवण्याचे ठरविण्यात आले. सोबतच ग्रामसभेचा ठराव पोलिस स्टेशन ला देऊन विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येणार आहे. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक रेवनात मेश्राम यांनी उपस्थिती दर्शवून अवैध दारू बंदीसाठी करावयाच्या उपाययोजना ग्रामसभेत विशद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button