रानटी हत्तींचा कळप सावली वनपरिक्षेत्रात दाखल
हत्तींकडून शेतपिकांची नुकसान करायला सुरुवात

चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यातील वसा, पोर्ला, साखरा, काटली, कुरखेडा, सेमाना वाकडी परिसरात दहशत माजवून शेतीचे नुकसान करणाऱ्या हत्तींचा कळप वैनगंगा नदीतुन व्याहाड बुज परिसरातील वाघोली बुट्टी आणि सामदा या गावात 30 सप्टेंबर ला रात्रीच्या सुमारास दाखल झाला. जवळपास 25 ते 30 हत्तींचा कळप असल्याची माहिती आहे. सामदा मार्गे व्याहाङ कापसी मार्गावर आपले प्रस्थान करताना जंगली हत्तीच्या समूहाने वाटेत येणाऱ्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर त्यांनी आपला समूह कापसी पेठगांव परिसरातील जंगलाकडे वळवीला असून परिसरातील जनतेसह शेतकरी वर्गात धास्तीचे वातावरण आहे.
व्यालाड बुज हे गाव चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वैनगंगा नदीच्या ऐल तिरावर असून पैल तिरावर गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वाकडी सेमाना गावात धुडगूस घातल्यानंतर वैनगंगा नदी ओलांडून हत्तीच्या कळपाने व्याहाड युज परिसरात काल रात्रौ प्रवेश केला. ऐन हातात येणाऱ्या पिकावर गजराजाच्या कळपाच्या पावलांचे ठसे पडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पीकांची नासाडी झाली असून आणखी किती नुकसान होणार? या भीतीने परिसरातील शेतकरी धास्तावला आहे तर वनविभागाचे कर्मचारी हत्तीच्या कळपास आपल्या क्षेत्रातून बाहेर कसे काढता येणार या प्रयत्नात रात्रीचा दिवस करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या व्याहाङ बुज गावाच्या सीमेला लागून वैनगंगा नदी आहे तर नदीच्या पलीकडे गडचिरोली जिल्ह्याची सीमा सुरु होत असून गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून जंगली हत्तीच्या कळपाने उच्छाद मांडून धान्य पीक तसेच शेतीत लावलेल्या भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान केले. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीच्या तिरावरुन हत्तीचा कळप कधीतरी व्याहाड बुज परिसरातील गावात दाखल होणार असल्याची कुणकुण वनविभागाला लागली असल्याने वनविभागाचे कर्मचारी वैनगंगा नदी किनारी गस्तीत होते. परंतु हत्तीच्या कळपाने वनविभागाची गस्त चुकवत अखेर व्याहाङ युज परिसरातील वाघोली बुट्टी आणि सामदा गावातील शेत शिवारात प्रवेश केला.
आता मात्र हत्तीचा कळपाचे आगमन आल्याने व्याहाङ युज परिसरातील शेतकऱ्यांना किती नुकसान सोसावे लागणार व वनविभाग हत्तीच्या कळपाची परिस्थिती कशी नियंत्रणात आणणार याकडे शेतकऱ्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे.
सावली वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या व्याहाङ बुज, डोनाळा, उपरी, शिर्शी या परिसरारत आधीच वाघाने दहशत मांडली असून मागील महिन्यात 2 इसमाचे बळी घेतल्याची घटना घडली होती. अजूनही त्या नरभक्षक वाघाला पकडण्यात वनविभागाला यश आले नाही. आधीच वन्यप्राण्याच्या हल्ल्याच्या भीतीचे सावट जनतेसह शेतकऱ्यावर असताना पुन्हा याच परिसरात हत्तीच्या कळपाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यासह जनतेत भीतीयुक्त वातावरण असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
हत्तीचा कळप आल्याची माहिती वनविभाग ला मिळाली आन्ही सर्व जण त्यांच्या वर पाळत ठेवून आहोत
– विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली
व्याहाङ बुज परिसरात दाखल झालेल्या हत्तीच्या समूहाने शेतकऱ्यांचे आलेल्या नुकसानी वनविभागाने त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी.
– कविता बोल्लीवार, सरपंच, व्याहाड बूज
व्याहाड बुज परिसरातील बळीराजावर नैसर्गिक संकटासह वन्यप्राण्याच्या भीतीची मालिका अविरत सुरु असून प्रशासनाने वेळीच वन्य प्राण्यांचा चंदोबस्त करावा.
– भाऊराव कोठारे, अध्यक्ष संताजी सोशल फॉउंडेशन, सावली
सावली तालुक्यात वन्य प्राणी व मानवी जीवन यांचा संघर्ष शिगेला पोहचला असून वनविभागाने जनतेच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाय योजना कराव्या.
– सुनील बोमनवार, अध्यक्ष, श्री किसान भात गिरणी मर्या. व्याहाङ बुज.



