क्राईमनागपूरविदर्भ

प्रॉपर्टी डीलरची कुहीमध्ये निर्घृण हत्या

उमरगाव परिसरात आढळला मृतदेह, शरीरावर धारदार शस्त्रांचे अनेक घाव

नागपूर : शहरातील एका ‘प्रॉपर्टी डीलर’ची कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरगाव येथे निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. रविवारी (दि. ७) सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह उमरगाव-पांढरकवडा मार्गावरील एका नाल्यात आढळला. मृताच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी केलेले अनेक खोल घाव आढळून आले आहेत.

मृत व्यक्तीचे नाव देवराव श्यामराव घरजाळे (वय ५६, रा. शिवांगीनगर, नागपूर) असे आहे. त्यांचा मुलगा मंथन घरजाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ९ वाजता त्यांना त्यांचा मावसभाऊ चिराग काकडे यांचा फोन आला. त्यानंतर त्यांनी आपल्या मामाच्या (नारायण भेंडे) निधनामुळे अंत्यसंस्कारासाठी कुसुंबी येथे जात असल्याचे घरी सांगितले आणि ते आपल्या दुचाकीने एकटेच निघाले.

त्यानंतर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास, त्यांची चुलत आत्तेबहीण निशा भोयर यांनी फोन करून देवराव घरजाळे हे उमरगाव-पांढरकवडा मार्गावर मृतावस्थेत पडलेले असल्याची माहिती दिली. मंथनने तत्काळ आपल्या बहिणीसोबत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना देवराव घरजाळे यांचा मृतदेह नाल्यात आढळला. त्यांची मोटारसायकल जवळच सुस्थितीत उभी होती. त्यांच्या गळ्यावर अर्धवट चिरलेले घाव, तसेच चेहरा, डोके, कान, खांदे, छाती, पोट, पाठ आणि करंगळीवर धारदार शस्त्रांनी वार केल्याचे दिसून आले.

देवराव घरजाळे हे नागपुरातील एका खाजगी पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या हत्येचे कारण आणि आरोपी अद्याप अज्ञात असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शीतल राणे आणि उपनिरीक्षक रमेश ताजने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button