
शेतकरी, कामगार व महिलांची लक्षणीय उपस्थिती
गडचिरोली : संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे २१ मार्ग बंद असतानाही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांनी, विशेषतः महिलांनी, लक्षणीय उपस्थिती दर्शवत जोरदार निदर्शने केली.
आंदोलनात जन सुरक्षा विधेयक रद्द करणे, चार श्रमसहिता रद्द करणे, खाजगीकरण करणे थांबवा, सर्व कामगारांना 26000 रु मासिक वेतन द्या, शेतकरी, कामगार, मजुरांना मासिक 5000 पेन्शन लागू करा , अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करा, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्याचे बळजबरी जमीन अधिग्रहण करु नये अशा विविध मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील कामगार संघटना, महिला कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व मार्ग बंद असतानाही, अन्याय आणि शोषणाच्या विरोधात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, शालेय पोषण आहार कर्मचारी, सफाई कामगार, शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्या या एकजुटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या आंदोलनात विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये सिटू (CITU) संघटनेचे कॉम्रेड रमेशचंद्र दहिवडे, आयटक (AITUC) चे कॉम्रेड देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अमोल मारकवार, भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुलवार, शेतकरी कामगार पक्षाचे भाई रामदास जराते, आझाद समाज पक्षाचे धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड, किशोर जामदार, सुरज जंकुल्लवार आणि विठ्ठल प्रधान यांचा समावेश होता. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.



