
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांच्या इमारती मोठ्या प्रमाणात मोडकळीस आल्या असून, यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची व देण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी या गंभीर समस्येकडे राज्य सरकारचे आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
डॉ. प्रणय खुणे यांनी नुकतीच चामोर्शी तालुक्यातील चापलवाडा येथील जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान त्यांना शाळेची इमारत पूर्णपणे मोडकळीस आलेली आणि अखेरची घटका मोजत असलेली दिसून आली. येथील शिक्षण व्यवस्थेचा ‘बारा वाजलेला’ असून, विद्यार्थी धोकादायक इमारतीत शिक्षण घेत असल्याचे त्यांनी पाहिले. शाळेच्या व्यवस्थापन समितीने वारंवार सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे गावकऱ्यांनी डॉ. खुणे यांना सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अनेक शाळांची अशीच दुरवस्था असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या समस्येबद्दल डॉ. प्रणय खुणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डॉ. खुणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या व्यवस्थेकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. मोडकळीस आलेल्या शाळांचे नवीनीकरण कसे करता येईल आणि नवीन शाळा बांधण्याकरिता काय उपाययोजना करता येईल, याकडे सरकारने प्राधान्याने लक्ष देण्याची मागणी केली. यासोबतच, त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनीही या गंभीर समस्येवर तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच रमेश लेकलवार, सत्यवान तंटकवार, राजू सातपुते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.



