गडचिरोलीविदर्भ

कमलापूर अंगणवाडीची निविदा वादाच्या भोवऱ्यात

ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा आल्याचा सरपंच रजनीता मडावी यांचा आरोप ; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन

अहेरी : तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या अंगणवाडी इमारतीच्या कामावरून आता ग्रामपंचायत आणि प्रशासन यांच्यात संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत. अंगणवाडीचे बांधकाम ग्रामपंचायतीला न देता परस्पर ई-निविदा काढल्याने कमलापूरच्या सरपंच रजनीता मडावी यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, निविदा रद्द न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित यंत्रणेमार्फत कमलापूर येथे ‘बाला पॅटर्न’ (Bala Pattern) अंतर्गत नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी निविदा क्रमांक 2026_GADCH_1301907_3 प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, निविदा टेंडर काढताना स्थानिक ग्रामपंचायतीशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात आला नाही किंवा त्यांची पूर्वपरवानगीही घेण्यात आली नाही. ही बाब स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी असल्याचे सरपंच मडावी यांचे म्हणणे आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांना दिलेल्या निवेदनात सरपंच रजनीता मडावी यांनी स्पष्ट केले आहे की, कमलापूर ग्रामपंचायत ही सर्व विकासकामे नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. तरीही ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता थेट निविदा प्रक्रिया राबवणे हे खेदजनक आहे. प्रशासनाने सदर निविदा प्रकिया तात्काळ रद्द करून ही कामे ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करावीत. अन्यथा, आपल्या कायदेशीर हक्कांसाठी ग्रामपंचायत कमलापूरला न्यायालयात धाव घ्यावी लागेल आणि सदर कामावर स्थगिती (Stay) आणली जाईल. असा इशारा सरपंच रजनीता मडावी यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील दुर्गम भागात स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्याचे धोरण एकीकडे राबवले जात असताना, दुसरीकडे अशा प्रकारे ग्रामपंचायतींना डावलून निविदा काढल्याने लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी पसरली आहे. आता या निवेदनावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button