गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

नक्षलवादाविरुद्ध राबविलेल्या आक्रमक आणि यशस्वी मोहिमांची दखल ; केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गडचिरोली पोलिसांचा विशेष गौरव

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने गेल्या काही वर्षांत नक्षलवादाविरुद्ध राबविलेल्या आक्रमक आणि यशस्वी मोहिमांची दखल आता केंद्र सरकारने घेतली आहे. छत्तीसगडमधील जगदलपूर (बस्तर) येथे केंद्रीय गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या नक्षलग्रस्त राज्यांच्या विशेष बैठकीत गडचिरोली पोलिसांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत नक्षलवादाच्या कंबरडे मोडणाऱ्या गडचिरोली पोलीस दलाच्या रणनीतीवर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला.

१८ मे रोजी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला देशातील नक्षलग्रस्त ८ राज्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे नेतृत्व पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी केले. या पथकात गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नीलोत्पल, विद्यमान पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि ‘सी-६०’ या नक्षलविरोधी विशेष पथकाचे प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते.

गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात राबविलेल्या विविध मोहिमांमुळे महाराष्ट्र पोलीस दलाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. बैठकीतल जगातील सर्वोत्तम नक्षलविरोधी पथकांपैकी एक असलेल्या सी-६० ने राबविलेल्या यशस्वी मोहिमा. अनेक बड्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेले यश. नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागात सुरक्षा यंत्रणेचे जाळे मजबूत करून स्थानिकांचा विश्वास संपादन करणे. अलीकडच्या काळात सशस्त्र नक्षलवाद्यांना अटक करून जिल्ह्याला नक्षलमुक्त करण्याच्या दिशेने उचललेली पावले. या मुद्द्यांची दखल घेण्यात आली.

या बैठकीत केवळ गौरवच झाला नाही, तर नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी केंद्र आणि राज्य पोलीस दलांनी पुढील दिशाही ठरवली आहे. विविध राज्यांमधील गुप्तचर माहितीची (Intelligence Sharing) देवाणघेवाण वाढविणे, सीमावर्ती भागात संयुक्त मोहिमा राबविणे आणि नक्षलवाद्यांची उरली-सुरली पकड मोडून काढण्यासाठी अधिक आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

गडचिरोली जिल्हा पोलीस दलासाठी हा गौरव अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ज्या गडचिरोलीला एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानले जात होते, तिथे आज पोलीस दलाच्या धडाकेबाज कामगिरीमुळे शांतता प्रस्थापित झाली आहे. केंद्रीय स्तरावर मिळालेली ही पावती संपूर्ण पोलीस दलाचे मनोधैर्य उंचावणारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button