
विरली (बु) येथील खळबळजनक घटना ; आरोपीला अटक
लाखांदूर : पैशांच्या क्षुल्लक वादातून एका इसमाला मारहाण करून त्याला कालव्यात बुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यातील विरली (बु) येथे २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. नरेश दुनेदार (वय ४५, रा. विरली बु.) असे मृतकाचे नाव असून, लाखांदूर पोलिसांनी त्याचा मित्र नारायण मेश्राम (वय ४२, रा. विरली बु.) याला तातडीने अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक नरेश दुनेदार आणि आरोपी नारायण मेश्राम हे दोघेही दुपारच्या सुमारास दारूच्या नशेत स्थानिक नहर (कालवा) परिसरात मासे पकडण्यासाठी गेले होते. याच वेळी नारायणने नरेशवर ‘पैशांची चोरी केल्याचा’ आरोप केला, ज्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. भांडणात संतापलेल्या नारायणने नरेशला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याला कालव्यात ओढत नेऊन पाण्यात बुडवून ठार मारले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने नरेशवर होत असलेल्या मारहाणीचा आणि नंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
घटनेदरम्यान उपस्थित नागरिकांनी त्वरित लाखांदूर पोलिसांना माहिती दिली. पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि आरोपी नारायण मेश्रामला तत्काळ अटक केली. मृतक नरेश दुनेदार हे गावात पानटपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे विरली गावात एकच खळबळ उडाली आहे.



