
नियम धाब्यावर बसवून रेतीचे उत्खनन सुरू असल्याचा आरोप ; लाखांदूर तालुक्यातील धक्कादायक घटना
लाखांदूर : रेती घाटातून डंपिंगच्या ठिकाणी वाळू घेऊन जात असताना ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन ईटान येथील सचिन विनोद सोदरकर (२६) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवार, २६ एप्रिल रोजी सकाळी ९:४५ वाजताच्या सुमारास ईटान रेती घाटाच्या शिवारात घडली. या अपघातामुळे संपूर्ण ईटान गावावर शोककळा पसरली असून, रेती उपशासाठी चालवल्या जाणाऱ्या जीवघेण्या स्पर्धेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
लाखांदूर तालुक्यातील ईटान रेती घाटाचा लिलाव झाला असून, गेल्या महिनाभरापासून येथे रेती उपसा आणि डंपिंगचे काम सुरू आहे. दररोजच्या प्रमाणे सचिन हा गावातीलच प्रमोद मोरेश्वर बनपूरकर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (क्र. एमएच ३६ एजी ८०४५) घेऊन घाटावर गेला होता. जास्तीत जास्त ट्रिप व्हाव्यात या उद्देशाने भरधाव वेगाने रेतीची वाहतूक सुरू असताना, अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. दुर्दैवाने सचिन या ट्रॉलीखाली दाबला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर सचिन जिवंत असावा या आशेने त्याला तातडीने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सचिनचे वडील तो लहान असतानाच वारले होते. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईने मोठ्या कष्टाने त्याचा सांभाळ केला होता. आता सचिन मोठा होऊन शेती आणि मजुरीच्या कामातून आपल्या संसाराचा गाडा चालवत होता. मात्र, या भीषण अपघातामुळे आईचा एकमेव म्हातारपणाचा आधार कायमचा हिरावला गेला आहे.
ईटान रेती घाटावर लिलावातील अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप या घटनेनंतर होत आहे. विना जीपीएस वाहतूक: नियमानुसार रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवणे अनिवार्य आहे. मात्र, ईटान घाटावर विना जीपीएस गाड्यांची सर्रास वाहतूक सुरू आहे. अति उपसा: निर्धारित ब्रासपेक्षा जास्त रेती उपसा करण्यासाठी दिवसभरात एका ट्रॅक्टरच्या २५ ते ३० ट्रिप मारण्याची सक्ती चालकांवर केली जाते. याच घाईघाईत सचिनला आपला जीव गमवावा लागल्याची चर्चा परिसरात आहे. अवैध साठेबाजी: डंपिंगच्या ठिकाणी रेतीचे मोठमोठे ढीग साचले असून, किती ब्रास उपसा झाला याचा कोणताही अचूक अंदाज प्रशासनाकडे नाही.
भंडारा येथे शवविच्छेदन झाल्यानंतर सचिनवर ईटान घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलीस या प्रकरणातील सर्व तांत्रिक बाबींची चौकशी करत आहेत.
अतिउत्खनन आणि नियमांच्या पायमल्लीमुळे एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



