गडचिरोलीविदर्भ

शिक्षक पदभरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यस्तरीय एसआयटी चौकशी होणार!

आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्न : शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती

गडचिरोली : नागपूर विभागातील शिक्षक पदभरती घोटाळा आणि शालार्थ आयडी घोटाळ्याने सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, ती केवळ नागपूर विभागापुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्यात पसरलेली असल्याचा दावा आमदार सुधाकर अडबाले यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील बोगस शिक्षक पदभरती आणि शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत (विशेष तपास पथक) करण्याची मागणी त्यांनी शुक्रवार (४ जुलै) रोजी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे केली. या एसआयटीमध्ये गृह, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी आणि उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्याची त्यांची मागणी आहे.

यावर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर देताना सांगितले की, या प्रकरणाची प्रशासकीय आणि पोलीस विभागामार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती बघता राज्यस्तरीय एसआयटी नियुक्त करून यात आयएएस (IAS), आयपीएस (IPS) दर्जाच्या अधिकाऱ्यांसह न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

आमदार अडबाले यांनी सभागृहात सांगितले की, महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात सध्या अराजकता माजली आहे. शिक्षक पदभरती घोटाळा आणि शालार्थ आयडी घोटाळा नागपूर या उपराजधानीत उघडकीस आला असला, तरी त्याची पाळेमुळे राज्यभर पसरली आहेत. २ मे २०१२ पासून शिक्षक पदभरती बंद करण्यात आली होती आणि फेब्रुवारी २०१३ ला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली. त्यानंतरही शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी २०१३ पूर्वी उत्तीर्ण झालेल्या डीएड (D.Ed.) धारकांच्या नियुक्तीस मृत शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने मान्यता दिली. २०१९ नंतर या पदभरतीस बोगस शालार्थ आयडी मिळविण्यात आले. यातून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची लूट करण्यात आली. या घोटाळ्यात शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, संचालक, आयुक्त कार्यालय तसेच मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा देखील समावेश असून, जवळपास १००० कोटींपेक्षा जास्त भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे.

नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये बोगस भरती आणि शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला असून, याची व्याप्ती मोठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या नियुक्तीस मान्यता व शालार्थ आयडी देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यस्तरावर तात्काळ एसआयटी नियुक्त करावी, अशी मागणी अडबाले यांनी केली. एसआयटीमध्ये गृह, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी आणि उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश असावा, असेही ते म्हणाले.

नागपूर विभागातील बोगस भरती, शालार्थ आयडी घोटाळ्यातील निलंबित सूत्रधार गेल्या तीन महिन्यांपासून फरार असून, त्याला अटक कधी करणार, असा सवालही अडबाले यांनी विचारला. या घोटाळ्यात १८ पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यांना बडतर्फ करावे, तसेच त्यांच्या संपत्तीची ईडीमार्फत (ED) चौकशी करावी, आदी प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानपरिषदेत उपस्थित केले.

यावर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तरात सांगितले की, नागपूर, भंडारा, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये बोगस भरती, शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकामार्फत करण्याची मागणी पोलीस विभागाकडे करण्यात आली आहे. तसेच संचालक, सहसंचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती बघता राज्यस्तरीय एसआयटी नियुक्त करून चौकशी करण्यात येणार असून, यात गृह, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी आणि उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्यात येणार असल्याचे मंत्री भोयर यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button