
मोबाईल व्हॅनद्वारे ग्रामीण भागात तपासणी शिबिरे, लवकर निदानावर भर
गोंदिया : कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गोंदिया जिल्ह्यात ‘मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन’ पाठवली आहे. २१ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत १०२८ लोकांनी मोफत तपासणीचा लाभ घेतला आहे.
जिल्ह्यात एकूण ९ ठिकाणी ही तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यातील के.टी.एस. रुग्णालय, बीजेडडब्ल्यू स्त्री रुग्णालय, तसेच रावणवाडी, कामठा, भानपूर आणि एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. याशिवाय, तिरोडा तालुक्यातील इंदोरा, बेरडीपार आणि सुकडी/डाक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही तपासणी झाली आहे.
या तपासणीत ६७७ लोकांची मुख कर्करोगासाठी, २०८ महिलांची गर्भाशय कर्करोगासाठी आणि १४३ महिलांची स्तन कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. मोबाईल व्हॅनमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये मुख कर्करोगासाठी डेंटल चेअर, स्तन कर्करोगासाठी प्रगत तपासणी यंत्रणा आणि गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कोल्पोस्कोप यंत्र यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासणीत कर्करोगाचा संशयित रुग्ण आढळल्यास त्याला पुढील उपचारांसाठी थेट कर्करोग रुग्णालयात पाठवले जात आहे. उपचाराची पुष्टी झाल्यास रुग्णाला शासनामार्फत पूर्णपणे मोफत उपचार दिले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांनी दिली.
जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील ३२ आरोग्य संस्थांमध्ये ही तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. ३ सप्टेंबरपासून ही व्हॅन गोरेगाव तालुक्यात दाखल झाली असून, पुढील शिबिरे गोरेगाव ग्रामीण रुग्णालय, पीएचसी सोनी आणि पीएचसी तिल्ली मोहगाव येथे आयोजित केली आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी सर्वांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.



