
डॉ. देवेंद्र घरतकर यांच्या पुढाकाराने ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र‘ अभियानात सक्रिय सहभाग
गोंदिया : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेला प्रतिसाद देत, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगावने वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प केला आहे. ‘रुग्णालय परिसर ऑक्सिजनयुक्त करा,’ असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र घरतकर यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार, सर्व विभागांना आपापल्या कार्यक्षेत्रात वृक्षारोपण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागानेही जैवविविधता जपण्यासाठी आरोग्य संस्था परिसरात वृक्षारोपण करण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. याच अनुषंगाने, २९ जुलै २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे डॉ. देवेंद्र घरतकर यांनी आपल्या चमूसह आरोग्य संस्था परिसरात वृक्षारोपण अभियान राबवले. संपूर्ण पावसाळ्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
२९ जुलै रोजी गोठणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दर्शनी भागात दहा ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी स्नेहल गायकवाड, आरोग्य सहाय्यक संतोष पारधी व किशोर कुर्वे, आरोग्य सहायिका लक्ष्मी मुनेश्वर, फार्मासिस्ट मुकुल बडवाईक, आरोग्य सेवक अमोल मालेकर, आरोग्य सेविका प्रमिला रॉय व नामुर्ते, समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया चव्हाण, परिचर बंडू उईके, स्टाफ ब्रदर्स चिरायू वावरे, आणि संगणक परिचालक फुलिचंद चौधरी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी डॉ. घरतकर यांनी झाडांचे महत्त्व विषद केले. “ऑक्सिजनशिवाय आपण जगूच शकत नाही. झाडे ऑक्सिजनची निर्मिती करतात. रुग्णालय परिसरात वृक्षारोपण केल्यास वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि पर्यावरणाला सुरक्षित ठेवतात. मानवाला झाडांमुळे शुद्ध हवा मिळते.” यामुळे सर्व आरोग्य संस्थांनी आपला रुग्णालयाचा परिसर विविध वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहनही डॉ. देवेंद्र घरतकर यांनी केले.



