
खेळाडूंना २८ ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन
गडचिरोली : महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण करण्याच्या उद्देशाने, दरवर्षीप्रमाणे यंदाही २९ ऑगस्ट, २०२५ रोजी गडचिरोली येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जाणार आहे. हॉकीचे जादूगार, मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली कॉम्प्लेक्स येथून भव्य क्रीडा रॅली काढली जाईल. यासोबतच विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे, ज्यात रस्साखेच, ५० मीटर रिले, चमचा गोळी, पोता दौड, योगा, खो-खो, कबड्डी आणि व्हॉलीबॉल या खेळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व इच्छुक खेळाडू आणि संघांनी २८ ऑगस्ट, २०२५ पर्यंत आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी https://fitindia.gov.in/national-sports-day-2025 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हास्तरावर गतवर्षीच्या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार, विविध क्रीडा उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त खेळाडूंना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.



